सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : 23 वर्षांच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या त्या मुलीने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. सहज म्हणून तिने डेटिंग अॅप (Dating APPs) डाऊनलोड केलं. स्वत:च्या प्रोफाईलशी एक प्रोफाईल मॅच होतंय हे बघून तिने एक फ्रेंड रिक्वेस्ट (Freind Request) स्वीकारली. समोरच्याने अविवाहित असल्याचं सांगितलं आणि मग सुरू झाली ऑनलाईन चॅटिंग (Online Chating). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या गेल्या. फोन नंबर एकमेकांना दिले गेले. भेटीगाठी होऊ लागल्या. 50 वर्षाच्या व्यक्तीला 23 वर्षांची ती मुलगी डेट करू लागली. त्याने त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी बऱ्याच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनंतर तो 50 वर्षीय पुरुष विवाहित आहे, त्याला दोन मुलं आहेत आणि लग्नाचं खोटं वचन देण्यात आलं याबद्दल त्या मुलीला कळलं. आपण फसवलो गेल्याचं तिच्या लक्षात आलं, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.


ही एकच मुलगी नाही तर गेल्या काही महिन्यात डेटिंग साईट वरती फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात.


डिजिटल फ्रॉडच्या (Digital Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येतेय. जसजशा टेक्नॉलॉजी येत गेल्या तसतसे ऐकिवात नसलेलेही फसवणुकीचे प्रकार व्हायला लागले आहेत. ज्यात सध्या डेटिंग ॲपचा उपयोग करून होणारे फसवणुकीचे प्रकार सर्रास ऐकायला मिळतात. या प्रकरणातही तसंच काहीसं घडलं.


ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ 
मॅट्रोमोनी फसवणूक - 69 केस
गिफ्ट आमिष - 94 केस
फोन कॉल फसवणूक - 391 केस


गेल्यावर्षी एकोणवीस हजार केस दाखल आहेत. त्यापैकी 25 ते 30 टक्के केस या सोशल साईट्स वरून फसवणुकीच्या आहेत. डेटिंग ॲप द्वारे फसवणुकीच्या प्रकारात आरोपी समोरच्याची संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करतात. समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात. 


असं ओढलं जातं जाळ्यात
त्यासाठी खरंखुरं भासेल अशी सोशल मीडियावर किंवा ॲप वर प्रोफाईल तयार केली जातात. समोरून तुम्हाला अप्रोच केला जातो. किंवा डेटिंग ॲपवर तुमची प्रोफाईल बघून स्वतःची प्रोफाईल आरोपी बनवतो. जेणेकरून तुम्हाला मिळत्या - जुळत्या प्रोफाईलचं सजेशन येईल. अशाप्रकारे तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं.


डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर मैत्री किंवा प्रेम इथपर्यंत जाण्याअगोदर समोरच्याची पूर्ण माहिती मिळवली पाहिजे. समोरून सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींवर थेट विश्वास ठेवणं धोकादायक आहे.  बऱ्याच केस अशा झाल्या आहेत की समोरची व्यक्ती अविवाहित असल्याचं सांगते, पण ती व्यक्ती विवाहित असते. केवळ महीनोंमहिन्याच्या चॅटिंगवर करोडो रुपये दिल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. 


सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात
सोशल मीडियावरून महिला किंवा तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचं आमिष दाखविलं जातं. त्यातून लैंगिक अत्याचार होतात. तसंच आर्थिक फसवणूक होण्याचेही प्रकार घडत आहेत.