सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका व्यक्तीने पत्नीला दरीत ढकलून तिची हत्या केली आहे. आरोपीने पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेल्यानंतर तिला दरीत ढकलून खून केल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीची पत्नी दरीत पडल्यानंतर झाडात अडकली होती. त्यानंतर आरोपीने तिचा साडीने  गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललिता अमोलसिंग जाधव (वय 36, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय 26) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अमोलसिंगने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. पोलीस बेपत्ता ललिताचा शोध घेत होते. त्यानंतर पोलिसांनी अमोसिंगवर संशय आला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोलसिंगने कुटुंबीयांच्या दबाबाखाली 10 वर्षे वयाने मोठ्या असलेल्या ललिताशी लग्न केले होते. अमोलसिंगचे पत्नीशी सातत्याने वाद व्हायचे. वयाने मोठी असल्याने त्याने पत्नीला सोडचिठ्ठी देण्यास सांगितले होते. मात्र, ललिताने अमोलसिंगला सोडचिठ्ठी देण्यास नकार दिला. त्यामुळे अमोलसिंग ललितावर संतापला होता. 28 ऑक्टोबर रोजी अमोलसिंग भाड्याने गाडी घेऊन पत्नीसह सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे दर्शनासाठी गेला. मांढरदेवी परिसरात पोहोचल्यानंतर त्याने चालकाला गाडी पार्किंमध्ये लावण्यास सांगितले. त्यानंतर दोघेही तिथून चालत निघाले. तितक्यात अमोलसिंगने गप्पा मारण्याचा बहाण्याने ललिताला दरीजवळ नेले आणि तिथून ढकलून दिलं.


मात्र दरीत ढकलल्यानंतर ललिता खाली न कोसळता तिथल्या एका झाडाच्या फांदीत अडकली. त्यानंतर आरोपी अमोलसिंग दरीत उतरला आणि त्याने साडीने ललिताचा गळा आवळला. ललिलाताचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर अमोलसिंगने तिचा मृतदेह दरीत फेकून दिला. त्यानंतर अमोलसिंगने तिथून पळ काढला. मात्र पोलिसांच्या चौकशीत ललिताची हत्या केल्याची कबुली अमोलसिंगने दिला.पोलिसांनी आरोपी अमोलसिंग जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करीत आहेत.