सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बारामतीतील (baramati) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. डॉ. वंदना मोहिते असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा डॉक्टर सेलची अध्यक्ष आहे. यासंदर्भात पोलीस नाईक नितीन भानुदास कोहक यांनी तक्रार दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढी वारी निमित्त कासुर्डी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या मार्गावरून पुणे शहराकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पोलीस नाईक नितीन कोहक हे त्यांच्या सहकाऱ्यासह त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. दरम्यान वंदना मोहिते या एका चारचाकी कारणे त्या ठिकाणी आल्या. यावेळी पुण्याकडे जाण्यावरून त्यांनी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसोबत वाद घातला. वंदना मोहिते यांनी नितीन कोहक यांच्या कानाखाली देखील मारली. त्यानंतर गाडीतून खाली उतरत त्यांनी बॅरिकेट बाजूला केले आणि त्या निघून गेल्या.


दरम्यान यवत पोलिसांनी या प्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी वंदना मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी रात्री वंदना मोहिते यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे.


पुण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची अरेरावी


गेल्या महिन्यात पुण्यातील औंध रोड येथे स्पायसर कॉलेज परिसराजवळ झालेल्या छोट्या अपघातानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने वाद घातल्याचे पाहायला मिळाले होते. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी एका महिलेने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. महिलेने दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी भादवि 354 (ए) (4), 324, 504, 506, 327 अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता.


26 मे 2023 रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास तक्रारदार महिला आणि तिचा पती कारमधून औंध रोडवरून जात होते. कार स्पायसर कॉलेजजवळ आली असताना छोटा अपघात झाला. महिलेची कार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची कार एकमेकांना घासून पुढे गेली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने खाली उतरत मोठ मोठ्याने वाद घालण्यास सुरुवात केली. महिलेच्या पतीने कारमधून बाहेर येत त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कारचा दरवाजा जोरात ढकलला. यामुळे महिलेच्या पतीला दुखापत झाली. त्यानंतर महिलेच्या कारची नासधूस केली. या सर्व प्रकरानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार नोंदवली आहे.