सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. पुण्यात मद्यधुंद बसचालकाने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस चक्क उलटी चालवत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पीएमटी (PMT) बस चालकाने दारु पिऊन वाद घातल्यानंतर बस चालकाने बस थेट उलटी चालवत दहा ते पंधरा गाड्यांना उडवल्याचे समोर आलं आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी आरोपी बसचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाने दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पीएमटी बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते. त्याचवेळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. चतु:श्रृंगी पोलिसांनी याप्रकरणी बसचा चालक निलेश सावंत याच्याविरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला आहे.


शनिवारी सकाळी हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पीएमटी चालक निलेश सावंत असे या चालकाचे नाव आहे. या बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी होते. एका गाडीचालकासोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात बसचालकाने बस थेट रिव्हर्स घेतली. त्यानंतर वेगाने बस पुढे नेली. त्यानंतर कृष्णा जाधव या युवकाने बसची काच फोडून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा चालक निलेश सावंत याने मद्यपान केले होते.


 



काय होतं संतोष माने प्रकरण?


बसचालक  संतोष माने याने 25 जानेवारी 2012 रोजी सकाळी स्वारगेट स्थानकातून एसटीची एक बस बाहेर काढली. त्यानंतर शहरातील सेव्हन लव्हजपासून ते सारसबागेपर्यंत विविध रस्त्यांवर बेदरकारपणे गाडी चालवत त्याने नऊ जणांचा बळी घेतला. तर 37 जणांना जखमी केले. शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला होता आणि 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही दुर्मिळातील दुर्मिळ आणि अतिहिंसक घटना असल्याचं कोर्टानं नमूद केलं होतं.


व्हायरल व्हिडीओमध्ये बसचालक निलेश सावंतने वेगाने बस मागे घेतल्यानंतर वाहनांना धडक दिली. त्यावेळी रस्त्यावरील नागरिकांनी त्याला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र त्याला न जुमानता मद्यपान केलेल्या बस चालकाने वेगात बस पुढे नेली. त्यावेळी बसमधील प्रवासी देखील त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच प्रवाशांनी यावेळी बसमधून हात बाहेर काढत लोकांना बस थांबवण्याची विनंती देखील केली.