ऑमलेट नीट बनवता येत नाही... पोलीस हवालदारांने पत्नीचा गळा दाबला
पोलिस हवालदाराकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
पुणे : क्षुल्लक कारणावरुन पुण्यात एका पोलीस हवालदाराने आपल्या पत्नीच्या खूनाचा प्रयत्न केला. तसंच मुलालाही त्याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. मनिष मदनसिंग गौड असं अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक इथल्या दत्तविहार सोसायटीत तो पत्नी आणि मुलासह रहातो.
मनिष गौड पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे. घरी असताना मनिषने आपल्या पत्नीला ऑमलेट बनवण्यास सांगितलं. पण मनिश गौडला ऑमलेटची चव आवडली नाही. यावरुन तो प्रचंड संतापला. त्याने पत्नीला ऑमलेट निट बनवून देता येत नाही का? असा सवाल करत शिवीगाळ केली. इतक्यावरच तो थांबला नाही. तो आपल्या पत्नीच्या अंगावर धावून गेला. आधी तिला जबर मारहाण केली. त्यानंतर पक्कडने तिच्या डोक्यात वार केला. यानंतरही त्याचा संताप शांत झाला नाही.
त्याने पत्नीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. आईला मारहाण होत असल्याचं पाहून त्यांचा मुलगा आईला वाचवण्यासाठी मध्ये आला. पण मनिष गौड याने मुलालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नी आणि मुलाला जीवघेणी मारहाण केल्याप्रकरणी मनीष गौड याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेत मनीष गौडला अटक केली आहे.