सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच मनोरुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलाच्या हातात 18 सुया आढळल्या आहेत. त्यामुळे कित्येक दिवस मुलावर अत्याचार सुरु होते याचा येरवाडा पोलीस तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात बालनिरीक्षणगृहातून येरवडा मनोरुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडित मुलाच्या हातात तब्बल 18 इंजेक्शनच्या सुया आढळल्या आहेत. मुलाच्या पालकांच्या तक्रारीनंतर येरवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.


याप्रकरणात येरवडा पोलिसांनी अत्याचार करणार्‍या संबधित 25 वर्षीय एकासह एक परिचारिका व चार सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 16 वर्षीय मुलाला सुरुवातीला येरवडा येथील बाल न्यायमंडळाच्या निरीक्षणगृहात दाखल केले होते. त्यानंतर त्याला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. त्याच ठिकाणी आधीपासूनच पॉस्कोच्या गुन्ह्यातील एक 25 वर्षांचा युवक उपचारांसाठी दाखल होता. त्या आरोपीनेच 16 वर्षीय अल्पवयीने मुलावर लैंगिक अत्याचार केले.


त्यानंतर 26 जून रोजी रुग्णालयातील बराकीमध्ये पीडित अल्पवयीन मुलगा आराम करत असताना रुग्णालयात काम करणारी एक परिचारीका आणि चार अनोळखी सुरक्षा रक्षकांनी त्याला भुलीचे इंजेक्शन दिले. मात्र यावेळी मुलाच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी मुलाच्या हाता एक्सरे काढला असता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एक्सरेमध्ये मुलाच्या हातात इंजेक्शनच्या अठरा सुया आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर अधिक तपास केला असता मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक कृत्य झाल्याचेही उघड झाले आहे. पालकांच्या तक्रारीनंतर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाल सुधारगृहात होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे मुलाला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिथे गेल्या दीड वर्षांपासून उपचार घेणाऱ्या आरोपीने मुलावर लैंगित अत्याचार केल्याची माहिती समोर आहे. आरोपीला पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. कारागृहात त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने त्यालाही मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील परिचारिका आणि सुरक्षारक्षकांनी मुलाला भुलीचे इंजेक्शन दिल्याचे अल्पवयीन मुलाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.