पुणे हादरलं! उद्योजकाने पत्नीची केली अघोरी पूजा, सर्वांसमोर करायला लावली आंघोळ
पुण्यातील उद्योजकाचा संतापजनक प्रकार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : विद्येचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. व्यवसायामध्ये भरभराट व्हावी तसंच घरात सुख शांती नांदावी यासाठी एका उद्योजकाने पत्नीची अघोरी पूजा करुन मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला चक्क सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावली.
पुण्यातल्या एक उद्योजक ऑटो प्रायव्हेटल लिमिटेडचा संचालक आहे. त्याचीही पत्नीदेखील या कंपनीमध्ये संचालक आहे. आपल्या व्यवसायामध्य भरभराट व्हावी तसंच घरात सुख शांती नांदावी यासाठी तो उद्योजक एका मांत्रिकाकडे गेला. यानंतर मांत्रिक मौलाना बाबा जमादार याने पीडित महिलेची अघोरी पूजा केली.
इतकंच नाही तर मुलगा व्हावा यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन उद्योजकाने आपल्या पत्नीला रायगड इथं नेलं, तिथे पुन्हा पूजा करुन तिला सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावली.
याआधीही होत होता छळ
2013 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं, त्यानंर त्या उद्योजकाने सातत्याने शारीरिक आण मानसिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. वारंवार मारहाण करणं आणि शिवीगाळही केली जात होती. तसंच माहेरच्यांनी दिलेल्या सोन्याचे, हिऱ्याचे आणि चांदीच्या दागिन्यांचा अपहार करण्यात आला.
महिलेच्या नावावर असलेल्या फ्लॅटची कागदपत्र गहाण ठेवून त्यावर 75 लाख रुपयांच कर्जही घेण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. वेळोवेळी मारहाण करुन व्यवसायासाठी आतापर्यंत 1 ते 2 कोटी रुपये घेतल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्याविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.