सागर आव्हाड, झी मीडिया,  पुणे :  गेल्या वर्षी इस्लामिक स्टेट (आयएस) संघटनेच्या अटक केलेल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांनी साताऱ्यात एक दुकान लुटून त्याच्या रकमेतून  बॉम्ब बनवण्याचे सामान खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे सातारा कनेक्शन उघड झालं आहे. दहशतवादी विरोधी पथकाकडून आता याप्रकरणाचा सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे आयसिस दहशतवाद मोड्युल प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनी साताऱ्यात एक दुकान लुटून त्याच्या रकमेतून बॉम्ब बनवण्याचे सामान खरेदी केले होते. या दहशतवाद्यांनी 1 लाख रुपये किमतीचे बॉम्ब बनवण्याची सामग्री खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. साताऱ्यात शाहनवाज आलम व मोहंमद साकी यांनी दुकानात लूटमार केल्यानंतर चोरी केलेली रोकड ही दहशतवादी कृत्यासाठी वापरल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच तयार करण्यात आलेल्या बॉम्बच्या चाचण्या विविध ठिकाणच्या जंगलात आरोपींनी घेतल्याचे आतापर्यंतचे चौकशीत निष्पन्न झालं आहे.


पुण्यातील कोथरूड भागात जुलै 2023 मध्ये तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते. हे तीन दहशतवादी पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे माहिती पुढे आली होती. यामध्ये शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (वय 31, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी उर्फ छोटू (वय 24, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली होती. कोथरुड पोलिसांनी या आरोपींना बाईक चोरताना पकडलं होतं. त्यानंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. तर एटीएसने तपासासाठी शहानवाज, महंमद, झुल्फीकार यांना तपासासाठी ताब्यात घेतले.


एटीएसने केलेल्या चौकशीत ही माहिती उघड झाली. या दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगसाठी कशा प्रकारे पैसे जमा केले आणि ते पैसे नेमके कोणाकोणाला व कशा प्रकारे दिले गेले याबाबतचा तपास सुरु केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.


कशी केली चोरी?


8 एप्रिल 2023 रोजी पुणे- सातारा महामार्गावरील एका साडीच्या दुकानात या तिघांनी दरोडा टाकला होता. दुकानदार रात्री बंद करत होता त्यावेळी तिघेजण आतमध्ये शिरले. त्यांनी व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या गल्ल्यातील एक लाख रुपयांची रोकड लुटली होती. याबाबत व्यापाऱ्याने सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.