पुणे : Pune doctor theft : गर्लफ्रेंडला अंगठी देण्यासाठी आणि हौसमौजेसाठी डॉक्टरांनी चोरी केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आणि त्यांचे बिंग फुटले. याप्रकरणात हडपसर पोलिसांकडून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अडीच लाखांच्या चार अंगठ्याही जप्त करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय शिक्षण घेणारया दोन विद्यार्थ्यांनी हौसमौजेसाठी त्यांनी एकाच दिवशी हडपसर आणि कोथरूडमधील नामांकित ज्वेलर्समधून अंगठ्या चोरून नेल्या होत्या. अनिकेत हनुमंत रोकडे (23 रा. नागोबानगर, लातूर) आणि  वैभव संजय जगताप (22 रा. केनवड ता. रिसोड जिल्हा वाशिम) यांना अटक केले आहे. अनिकेत रोकडे एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएसचे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याला गर्लफ्रेंडला अंगठी गिफ्ट करायची होती. 



तर साथीदार वैभव जगताप हा सुद्धा बीएससी नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्यांना नशेचे व्यसन आहे. मौजमजेसह मैत्रिणींना फिरविण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी 8 डिसेंबरला हडपसरमधील एका ज्वेलर्समध्ये अंगठ्या खरेदीचा बहाणा केला. त्याठिकाणी सेल्समनकडून तीन अंगठ्या पाहण्यासाठी ताब्यात घेतल्या. मात्र, सेल्समन सोन्याचा ट्रे दुसरीकडे ठेवत असल्याची संधी साधून त्यांनी तीन अंगठ्या चोरून नेल्या. दरम्यान, त्यांची ही हातचलाखी सीसीटीव्हीत चित्रित झाल्याने भांडाफोड झाला.


याप्रकरणाची हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्याच दिवशी चोरट्यांनी कोथरूडमधील ज्वेलर्समध्येही अशाच पद्धतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकाचे पोलीस अंमलदार शाहीद शेख, निखील पवार आणि प्रशांत दुधाळ यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेउन चौकशी केली असता, त्यांनी चार अंगठ्या चोरीची कबुली दिली.