Drunk Young Girl Video: मुळशी पॅटर्न सिनेमातील पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशी याने काही दिवसांपुर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन मुली नशेत असल्याचे दिसत आहे. रमेश परदेशी याने त्या मुलींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यातील एक मुलीची अवस्था अत्यंत गंभीर होती. दरम्यान त्या मुलींचा चेहरा दाखवल्याने रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्याच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला पत्रकार नेहा पुरव यांनी यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्याचे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 


काय आहे फेसबुक पोस्ट?


एक महिला म्हणून आणि एका तरुण मुलीची आई म्हणून मी या प्रकाराने खूपच अस्वस्थ झालेय.. पुण्यात दोन मुली नशेच्या अमलाखाली सो कॉल्ड संस्कृती रक्षकांना आढळून आल्या... सगळ्यात आधी त्या मुलींनी जे केले ते अत्यंत चूकच आहे त्या बद्दल त्यांना माफ करताच येणार नाही पण या मुलींचे वय आणि त्यांची पुढची करिअर, पुढील आयुष्य बघता हा व्हीडिओ viral करणे किती योग्य होते? त्यांचे चेहरे न दाखवता स्वतःच्या समाजसेवेचा डांगोरा पिटता आला नसता का? ह्या प्रकारात मुलींचे फोटो दाखवणे हा गुन्हा आहे.. या मुलींच्या पालकांना सांगून आणि या मुलींचे काउन्सल्लिंग करून योग्य मार्ग निवडता आला नसता का? असा प्रश्न नेहा यांनी उपस्थित केलाय. 



मी या प्रकारानंतर पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशन मधुन पत्रकार म्हणून माहिती घेतली, तेव्हा या मुली बिअर प्यायला होत्या आणि पोटात अन्न नसल्याने त्यांना नशा आल्याचे पोलिसानी सांगितले.. या मुलींनी drugs घेतले नव्हते... मी मुलींना पाठीशी घालत नाही पण अशा प्रकारे व्हीडिओ viral करण्याला माझा आक्षेप आहे... मी महिला आयोगाकडे एक महिला म्हणून तक्रार नोंदवली असल्याचे नेहा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


काय आहे प्रकरण?


अभिनेता रमेश परदेशी  याने एक पुण्यातील वेताळ टेकडीवरील एक व्हिडीओ सोशल मीडियात अपलोड केला. या व्हिडीओत दोन मुली दिसत आहेत. त्यातील एक मुलगी बेशुद्ध आहे. तर दुसरी मुलगी नशेत बडबड करताना दिसत आहे. रमेश आपल्या व्हिडीओत म्हणतोय, आम्ही वेताळ टेकडीवर पळायला आलो होतो. तर येथे महाविद्यालयात असणाऱ्या पहिल्या वर्षातील दोन तरुणी बिअर, दारु आणि नशेचे काहीतरी घेऊन कोपऱ्यात पडल्या होत्या. काही तरुणांनी त्यांना उचलून आणले. आम्ही त्यांना रुग्णालयात नेत आहोत. पण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? असा प्रश्न त्याने उपस्थित केला होता. शिक्षणाचं माहेरघर म्हटल्या जाणारे पुणे नशेमुळे बदनाम होत आहे, याकडे लक्ष वेधणे हा आपला हेतू असल्याचे त्याने सांगितले. 


यानंतर रमेश यांने स्थानिकांच्या मदतीने दोघींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांची तब्येत आता व्यवस्थित असल्याचेही सांगितले. त्या मुली आपल्या मुलीप्रमाणे असल्याचे त्याने सांगितले. तसेच मुलींचा चेहरा दिसत असल्याने तो व्हिडीओ आणि त्यांचे फोटो कृपया समोर आणू नयेत असे आवाहन त्याने माध्यमांना केले होते.