अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : भूमीपूजन होऊन वर्ष सरत आलं तरी पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम सुरु झालेलं नाही. पुलाच्या कामाला उशीर होत असल्यानं, त्याचा खर्च वाढत असल्याची बाब माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांनी निदर्शनास आणली आहे. त्यामुळे हा उड्डाण पूल नक्की कधी उभा राहणार, याची विचारणा होऊ लागली आहे. 


इथली वाहतूक एखाद्या अमिबाप्रमाणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाव चांदणी चौक असलं तरी इथली वाहतूक एखाद्या अमिबाप्रमाणे आहे. कुठलं वाहन कुठून येणार आणि कुठे जाणार काही कळत नाही. त्यामुळे सततची वाहतूक कोंडी तसंच अपघात ही इथली गंभीर समस्या आहे. या समस्येवर उपाय म्हमून इथं उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. 


प्रसिद्धीसाठी उड्डाण पुलाचं भूमीपूजन


२०१२- १३ मधेच त्याची आखणी करण्यात आलीय. त्यासाठी त्यावेळी २२० कोटी खर्च अपेक्षित होता, मात्र तो अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यानं त्याचा खर्च ३७१ कोटींवर गेलाय. त्याचप्रमाणे पुलासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण झालेलं नाही. माहिती अधिकारात ही बाब उघड झालीय. असं असताना केवळ प्रसिद्धीसाठी उड्डाण पुलाचं भूमीपूजन केलं होतं का असा प्रश्न विचारण्यात येतोय. 


भूसंपादनाच्या कामाला गती


चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. त्याचप्रमाणे भूसंपादनाचाही विषय होता. मात्र आता भूसंपादनाच्या कामाला गती आली असून स्वतंत्र कार्यालयामार्फत ही प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलंय. 


पुण्यात शिरण्यासाठी चांदणी चौक हे प्रवेशद्वार


मुंबई - बंगळूर महामार्गावरून पुण्यात शिरण्यासाठी चांदणी चौक हे प्रवेशद्वार आहे. त्याचप्रमाणे मुळशी, हिंजवडी, वारजे अशा विविध दिशांनी येणाऱ्या वाहनांचं हे जंक्शन आहे.  तासाला हजारो वाहनांची रहदारी या चौकात असते. त्यामुळेच या उड्डाणपुलाच्या विषय नुकताच अधिवेशनातदेखील उपस्थित झाला होता. असं असताना तो लवकरात लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.