पुणे : पुण्यात गणेशभक्तांचा उत्साह टिपेला पोहचलाय. मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली. त्यामुळे दगडूशेठ हलवाई आणि मंडई गणेशाची मिरवणूक रात्री उशीरा निघणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. इको फ्रेंडली पद्धतीने कृत्रिम तलावात मानाच्या गणेशांचं विसर्जन करण्यात आलं. मानाचा पहिला कसबा गणेश, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरूजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती यांचं विसर्जन करण्यात आलं.


मुंबई - पुणे - नाशिक - नागपूर - ठाणेसह राज्याच्या सर्वच शहरांमध्ये आज एकच गजर सुरू होता. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... गेली बारा दिवस राज्य होतं केवळ गणरायाचं. मुंबईतले राजे असोत की पुण्यातले मानाचे गणपती... 


गेले 12 दिवस भाविक गणरायाला पूजत होते आणि त्याचा उत्सव उत्साहात साजरा करत होते. आता या भूतलावरचा आपला 12 दिवसांचा मुक्काम संपवून बाप्पा परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांना वाजतगाजत, मानाने, भक्तीभावाने निरोप दिला गेला. या भक्तीभावाला जोड मिळत्ये संस्कृतीची, तरूणांच्या उत्साहाची, ढोलताशा वादनाची, लेझीम नृत्याची, आदिवासी तारपा नृत्याची आणि सर्वधर्मीय एकतेचीही...


सर्वसामान्यांना त्यांच्या रोजच्या जगण्यातली कटकट, त्रास दूर ठेऊन उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याची शक्ती देणारे असे हे 12 दिवस... सर्व समाजाला एका सुत्रात बांधण्याची शिकवण देणारा बुद्धीच्या देवतेचा हा उत्सव संपन्न होत आहे. 


मात्र हाच जल्लोष, उत्साह आणि अपार भक्तीभाव मनात ठेऊन पुढच्या वर्षी लवकर या म्हणजे तेव्हाही तुमच्या आगमनाचा जल्लोष असाच साजरा करता येईल ही भावनाच आज प्रत्येकाच्या मनात दाटून आलीय.