अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी ७ वाजता सुरु करण्याची मागणी काही मंडळांनी केलीय. मानाच्या गणपती मंडळांनी मात्र त्याला विरोध केला आहे. पुण्यातल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजता सुरु होते. मंडईतल्या टिळक पुतळ्याला हार घातल्यानंतर मानाचे गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ होतात. मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या लक्ष्मी रस्त्यानं ही मिरवणूक टिळक चौकात पोहोचते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक संपायला संध्याकाळ होते. तोवर इतर मंडळांच्या मिरवणुकीला खोळंबून राहावं लागतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून शहरातील विसर्जन मिरवणूक लांबत जाते. शेवटचा गणपती विसर्जित व्हायला दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होते. या सगळ्यामुळे मिरवणूक लवकर सुरु करून लवकर संपवण्याची मागणी पूर्व भागातील मंडळांनी केली आहे.


विसर्जन मिरवणूक लवकर सुरु केली तरी इतर मंडळं मानाच्या गणपतींपाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होत नाहीत असा दावा मानाच्या गणपती मंडळांनी केलाय. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा मोडता कामा नये अशी मानाच्या गणपती मंडळांची भूमिका आहे. 


नागरिकांना होणारा नाहक त्रास, पोलिसांसह एकूणच व्यवस्थेवर येणारा ताण तसंच उर्वरित मंडळांच्या नाचण्या - वाजवण्यावर येणाऱ्या मर्यादा हे मिरवणूक उशिरा सुरु होण्याचे दुष्परिणाम आहेत. या अनुषंगानं पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपावी यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा वादाचा विषय नसून विचारमंथनाचा विषय आहे हे साऱ्यांनी ध्यानात ठेवण्याची गरज आहे.