हेमंत चापुडे / आंबेगाव, पुणे : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. कोरोना बाधितांचा आकडा वाढत  असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर काही लोक चार हात लांब राहिल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी कोरोना म्हटले की लोक चार हात दूरच रहाणे पसंत करतात, कोरोना बाधीत रुग्णाजवळ अनेकदा रक्ताचे नातेवाईकही येत नाहीत. परंतु पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे यांनी रक्ताच्या पलीकडच्या माणुसकीचे नाते जपत कोरोना बाधित रुग्णांना आपल्या खासगी गाडीचा रुग्णवाहिका म्हणून उपयोग करत रुग्णांची मदत केली आहे. डोंगराळ आदिवासी भागात अनेकदा ॲम्बुलन्स सेवा वेळेवर मिळत नसल्याने काळे यांनी आपली स्वतःची गाडी रुग्णवाहिका म्हणून तिचा वापर केला. एवढेच नव्हे तर स्वत: चालक होऊन आतापर्यंत 150 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्यांचे जीव वाचवले आहेत.


तर काळे यांनी एवढ्यावरच न थांबता अनेकदा कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी रक्ताचे नातेवाईकही जवळ येत नसतात अशा वेळी स्वत: आपल्या सहकाऱ्यांसह मृतदेह रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत घेऊन गेले. त्यांनी आतापर्यंत 35 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे काळे यांनी रक्तापलिकडचे जपलेलं हे माणुसकीचं नातं निश्चित कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्यांचे परिसरातून आणि सर्वत्र कौतुक केले जात आहे.