जावेद मुलाणी, इंदापूर, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Indapur Farmer Success Story: शेतीतून चांगले उत्पन्न मिळावे यासाठी बळीराजा रात्रंदिवस शेतात राबतो. शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करत असतो. असाच एक प्रयत्न इंदापूर येथील शेतकऱ्यांनी केला असून त्यांच्या शेतात पिकवलेली जांभळाची विक्री आता थेट इ कॉमर्स वेबसाइट असलेल्या ॲमेझॉनवरून (Amazon) होत आहे. त्यामुळं जांभळाला दरही चांगला मिळत आहेत. तसंच, आर्थिक उत्पन्नातही वाढ झाली आहे. थेट ॲमेझॉनवरून जांभळांची विक्री होत असल्याने हा शेतकरी आता परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. जांभळाची विक्री ॲमेझॉनवरून कशी होत आहे हे पाहुयात. या विशेष लेखातून


इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील अमर बरळ यांची शेती ही खडकाळ जमिनीवर आहे. पूर्वी ते डाळिंबाचे उत्पादन घेत होते मात्र काही वर्षांपूर्वी गारपीटीमध्ये अनेक बागा जमीनदोस्त झाल्या त्यातच  यांची ही बाग जमीनदोस्त झाली होती. त्यातून सावरत असतानाच ते कोकण येथे एका शेतकरी सहलीसाठी गेले होते. तिथेच त्यांना प्रशिक्षण मिळाले असता तिथून प्रेरणा घेऊन त्यांनी अडीच एकर जांभळाची बाग फुलवली. 


जांभूळ हे जंगली पिक असल्याने खडकाळ जमिनीवर जांभळाची शेती बहरते. तसंच, जंगली पिक असल्याने यावर रोगराई ही कमी प्रमाणात असल्याने फार कमी प्रमाणात त्यांना औषध फवारणी करावी लागत आहे. पाच वर्षानंतर जांभळाच्या प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी पुणे मुंबई आणि सोलापूर या ठिकाणी जांभूळ विक्री केली त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले.


सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचाच फायदा घेत अमर बरळ यांनी ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीबरोबर करार करून ॲमेझॉनच्या मार्फत जांभळाची विक्री करण्यास सुरुवात केली. Amazonवर त्यांना किलोला 200 ते 280 इतका दर मिळू लागला आहे. त्याचबरोबर शहरातील मॉलमध्येदेखील त्यांच्या शेतातील जांभळे विक्रीला जात आहेत. त्याचबरोबर काही प्रमाणात जांभूळ हे पुणे, सोलापूर आणि मुंबई या बाजारपेठेमध्ये देखील जात आहे.


बरळ यांचे कुटुंब जांभळाची तोडणी घरच्या घरीच करीत असून तोडणी करून मालाची निवड करून जांभळ पॅकिंगमध्ये भरून ते सध्या टेंभुर्णी येथील ॲमेझॉनच्या सेंटरवर विक्रीसाठी पाठवत आहेत. किरकोळ बाजारपेठेमध्ये जांभळाला सध्या 70 रुपयापासून ते 150 रुपये असा किलोला दर मिळत आहे. मात्र ॲमेझॉनवर जांभळाला किलोला 200 ते 280 असा दर मिळत असल्याने बरळ यांना सध्या चांगला नफा हा जांभूळ विक्रीतून मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.


दरम्यान, तरुण शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरत शेती करुनही चांगले उत्पन्न मिळू शकते हे दाखवून दिलं आहे. नवीन पर्याय वापरत शेतीमालाची विक्री केली आहे. जिल्ह्यात सध्या या शेतकऱ्याची चर्चा आहे.