सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शिरपेचात सोशल मीडियावर मानाचा तुरा रोवला गेला असून महापौर मोहोळ यांनी ट्विटरवर एक लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. या टप्प्यासह महापौर मोहोळ भारतातील महानगरातील ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय महापौर झाले असून त्यांना सर्वाधिक फॉलोअर्स असल्याची नोंद झाली आहे. लोकसंवादासाठी महापौर मोहोळ यांचा ट्विटरचे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. विशेष म्हणजे पुण्यासह महापौर मोहोळ यांना देशभरातून फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यातही सर्वपक्षीय फॉलोअर्स असणे, ही महापौर मोहोळ यांच्यासाठी जमेची बाजू ठरली.



देशातील महानगरात महापौर मोहोळ सर्वाधिक लोकप्रिय असताना त्यांच्या पाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा क्रमांक आहे. मात्र त्यातही पेडणेकर यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स मोहोळ यांना मिळाले. ट्विटरवरील यशाबद्दल माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, 'जनसंवादाची पारंपरिक माध्यमे काहीशी मागे पडत असताना सोशल मीडिया हे थेट नागरिकांशी संवाद साधण्याचे प्रभागी माध्यम आहे.


माझ्याकडे महापौरपदाची जबाबदारी आल्यावर प्रत्यक्ष फिल्डवर काम करतानाच या माध्यमाचा वापर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकानीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पुण्यासारख्या महानगराचे नेतृत्व करत असताना नागरिकांकडून ट्विटवर नव्या कल्पना, सूचना, समस्या याची थेट माहिती मिळत राहिली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला'.


महानगर/महापौर/ट्विटर फॉलोअर्स


१) पुणे/मुरलीधर मोहोळ/१ लाख +
२) मुंबई/किशोरी पेडणेकर/४९ हजार+
३) हैदराबाद/विजयालक्ष्मी गडवाल/२३ हजार+
४) आग्रा/नवीनकुमार जैन/९ हजार +
५) सुरत/हेमाली बोघावाला/८ हजार+
६) अहमदाबाद/कीर्तीकुमार परमार/४ हजार+