मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, `मंत्री महोदयांच्या दबावामुळे..`
महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे.
महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने ही कारवाई केली आहे. या निलंबित काळात त्यांची बदली नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. आता याप्रकरणी डॉ. भगवान पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांनी एक पत्र लिहित खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची काम करण्यास सांगितली. त्यासोबतच इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला. पण मी नियम बाह्य काम केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे, असा आरोप डॉ. भगवान यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. भगवान पवार यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
"मी सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण 30 वर्षे सेवा केली आहे. यात पुणे आणि सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी येथे एकूण 13 वर्षे उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. कोव्हिड 19 च्या काळात मी पुणे जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ठ सेवा बजावलेली आहे. सद्यस्थितीत मी आरोग्य अधिकारी (आरोग्य प्रमुख), पुणे महानगरपालिका या ठिकाणी 13 मार्च 2023 पासून कार्यरत होतो. या ठिकाणी माझ्या कामकाजाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत अथवा प्रशासकीय चौकशी झालेली नाही. तसेच आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे माझ्या कामकाजाबाबज प्रतिकूल शेरे नाहीत. तरीही शासनामार्फत माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत आणि हे मला 24 मे 2024 रोजी संध्याकाळी ६ वाजता मिळाले.
माझे काम आणि सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून आणि हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतून प्रेरिती होऊन माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मां. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयता वारंवार बोलवून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामामध्ये मदत करण्यास दबाव आणला होता. परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही आणि इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरु केली होती.
माझे निलंबन हे माझ्या विरुद्ध तक्रारीमध्ये तथ्य नसतानाही त्रास देण्याच्या हेतूने आणि माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मा. मंत्री महोदय यांच्या दबावामुळे केलेले आहे, अशी माझी धारणा आहे. झालेल्या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटुंब मानसिक तणावामध्ये आहे. निलंबन करत असताना, माझ्या सध्याच्या कार्यात तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि माझे म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी न देता माझे निलंबन करुन माझ्यावर अन्याय झालेला आहे", असे डॉ. भगवान पवार यांनी म्हटले.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आयुक्तालयाने 29 एप्रिल रोजी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. पवार यांच्याविरुद्ध तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहता निष्पक्ष चौकशी होण्याच्या दृष्टीने त्यांचे निलंबन करणे आवश्यक आहे, अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार भगवान पवार यांचं निलंबन करण्यात आलं होतं.