Pune Metro: `तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!` पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
Pune Metro News: वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले.
Pune Metro News: वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले. पण या पार्किंगवरुन सजग पुणेकरांनी वाद घातला आणि पुणे मेट्रो प्रशासनाला मोठा निर्णय घ्यावा लागला. पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पे-अँड-पार्कची सुविधा सुरू करण्यात आली. पण पहिल्याच दिवश ही सुविधा वादात आली. कारण पे-अँड-पार्कसाठी नेमलेल्या कंत्राटदाराने पुणेकरांकडून जास्त पार्किंग शुल्क आकारायला सुरुवात केली. काही सजग पुणेकरांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात आवाज उठवला. बघता बघता या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होऊ लागल्या. आणि पुणे मेट्रो प्रशासनापर्यंत पोहोचल्या. यानंतर प्रशासनाला कडक पाऊल उचलावे लागले. काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.
किती आकारायचे शुल्क?
शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन परिसरात ही पे अॅण्ड पार्किंगची सुविधा सुरु होती. कंत्राटदाराने सोमवारपासून काम सुरू केले आणि तो ठरल्यानुसार दर आकारत नसल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आम्ही त्याला काम करण्यापासून रोखले आणि निलंबितही केले. पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. करारानुसार वाहनचालकांकडून 2 तासांसाठी 15 रुपये शुल्क आकारणे अपेक्षित होते. असे असताना कंत्राटदार नुकत्याच सुरू झालेल्या पे-अँड-पार्कमध्ये दुचाकी चालकांकडून एक तासासाठी 15 रुपये आणि चारचाकीसाठी 35 रुपये आकारत असल्याचे आढळले.या संपूर्ण प्रकरणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांची नाराजी आणि चिंता व्यक्त केली. मेट्रोच्या तिकिटापेक्षा पार्किंग शुल्क जास्त असल्याचा दावा त्यांनी केला.
पुणेकरांच्या सोशल मीडियात प्रतिक्रिया
एका यूजरने लिहिले, तिकीटावर जीएसटी क्रमांक कुठे आहे? सरकारी कंत्राट मिळविण्यासाठी सर्व पार्किंगच्या ठिकाणी ते अनिवार्यपणे असणे आवश्यक आहे. तसेच 'जर एखादा माणूस सकाळी ऑफिसला जातो आणि मेट्रो पार्किंगच्या जागेवर आपली कार पार्क करतो आणि 10 तासांनंतर परत येतो, तर त्याची किंमत किती असेल? लोक मेट्रो तिकिट घेणार नाहीत आणि स्वतःची वाहने वापरतील', असे दुसऱ्या युजरने लिहिले.
'मेट्रो पार्किंगची सेवा विनामूल्य असणे आवश्यक आहे. किंवा ते एखाद्या शॉपिंग मॉलसारखे असावे, जिथे तुम्ही मेट्रोचे तिकीट दाखवाल आणि पार्किंग विनामूल्य मिळेल, अशी प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली.
मेट्रोची वेळ वाढवण्याची मागणी
दरम्यान, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (टप्पा-1) पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन केले. आता मेट्रोची वेळ मध्यरात्री वाढवण्याची मागणी प्रवाशांनी सुरू केली आहे. सध्या मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालते.