मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे मेट्रोच्या वेळेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पुण्यात आला सकाळी 7 ऐवजी 6 वाजल्यापासून मेट्रो धावणार आहे. म्हणजेच पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता असेल. 17 ऑगस्टपासून मेट्रो नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय या दोन्ही मार्गांवरील मेट्रोच्या वेळेत हा बदल करण्यात आला आहे. या दोन्ही मेट्रो एक तास लवकर सुरू करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला. मुंबईला जाणारे रेल्वे प्रवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे मेट्रो सध्या सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत सुरू आहे.  पण आता मात्र मेट्रो एक तास लवकर धावणार आहे. त्यामुळे मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू होणार आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रोने प्रवास करताना धावपळ करावी लागत होती. तसंच रेल्वे स्थानकावरून सकाळी लवकर सुटणाऱ्या गाड्या पकडण्यासाठीही पुणेकरांना घड्याळ्याच्या काट्यानुसार पळावं लागत होतं.. पण आता मेट्रो 6 वाजता सुरु झाल्यानंतर विद्यार्थी आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही. 


महामेट्रोने काय सांगितलं आहे?


पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते दिवाणी न्यायालय या दोन्ही मार्गांवर पुणे मेट्रोची प्रवासी सेवा आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहील अशी माहिती मेट्रोकडून देण्यात आली आहे. 



अजित पवारांची सूचना, प्रवाशांनी केली होती विनंती 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मेट्रोने प्रवास केला होता. यावेळी त्यांनी प्रवाशांसह चर्चा करताना त्यांच्या समस्या, मतं जाणून घेतली होती. यावेळी काही प्रवाशांनी अजित पवार यांना आपल्या अडचणी सांगत मेट्रो सेवा सकाळी 6 वाजल्यापासून सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी महामेट्रोला सूचना करत वेळेत बदल करण्याची सूचना केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महामेट्रोने तातडीने वेळेत बदल केला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 



पुणे मेट्रोचं संपूर्ण वेळापत्रक 


वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
सकाळी 6 ते 8 - दर 15 मिनिटांनी 
सकाळी 8 ते 11 - दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 - दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 - दर 10मिनिटांनी
रात्री 8 ते 10 - दर 15 मिनिटांनी


पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते जिल्हा न्यायालय मार्ग


सकाळी 7 ते 8 - दर 15 मिनिटांनी 
सकाळी 8 ते 11- दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 - दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 - दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 - दर 15 मिनिटांनी