पुण्याच्या भाजप आमदारानं तक्रारदाराचे पाय धरले
खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी भाजप आमदाराने चक्क तक्रारदाराचे पाय धरल्याचा दावा करण्यात येतोय.
नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी भाजप आमदाराने चक्क तक्रारदाराचे पाय धरल्याचा दावा करण्यात येतोय. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांच्या तक्रारीवरुन आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पण हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आमदारांनी बऱ्हाटेंचे अक्षरशः पाय धरल्याचा दावा तक्रारदार रविंद्र बऱ्हाटेंनी केलाय. तक्रार दाखल करु नये. ती मागे घ्यावी यासाठी बऱ्हाटे यांच्या हॉटेलवर आमदार योगेश टिळेकर गेले होते. त्यावेळी त्यांनी बऱ्हाटे यांचे पाय धरले. बऱ्हाटे यांनी याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपूर्द केलंय.
मात्र आपण माफी मागण्यासाठी अजिबात नमस्कार केला नसल्याचा दावा आमदार योगेश टिळेकरांनी केलाय.
खंडणीप्रकरणी आमदार टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल आहेच. त्याचा तपासही सुरू आहे. त्यामुळे आमदार टिळेकर यांनी बऱ्हाटेंचे पाय धरण्यामागे नेमका काय कार्यकारण भाव होता हे लवकरच सिद्ध होईल.