पुण्यातील खराडी परिसरात घोंगावणारं `ते` वादळ डासांचं नाही! धक्कादायक माहिती आली समोर...

Pune Mosquito Tornado: पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत तुम्ही डासांचे वादळ पाहू शकता. पण हे खरंच डास आहेत का? जाणून घ्या नेमकं प्रकरण
Pune Mosquito Tornado: दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात मोठ्या प्रमाणांवर डासांचा वावर पाहायला मिळतोय. जणू डासांनी या इमारतींवर हल्ला केल्यालाच भास होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील केशवनगर मुंढवा खराडी नदीपात्रातील असल्याचे सांगण्यात येतेय. मात्र, आता हे डास नसल्याचे समोर आले आहे.
पुण्याच्या खराडी परिसरात डासांचं वादळ घोंगावत असल्याचा व्हिडीओ गेले दोन दिवस सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वावटळी प्रमाणे आकाशात घिरट्या घालणारे हे जीव प्रत्यक्षात डास नसून डास सदृश कीटक आहेत. . विशेष म्हणजे ते कुठल्याच स्वरूपाचा चावा घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून आजार पसरण्याचा धोकादेखील नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
किटकांचा धोका नसला तरी नदीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढलंय ह्याच द्योतक म्हणजे हे कीटक आहेत, असं मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केशवनगरच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात हे किटक पाहायला मिळत आहेत. पुण्यातील मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साठलेल्या जलपर्णी तसेच या वाढलेल्या जलपर्णींमुळे या परिसरात डास, मच्छर,कीटक आणि माश्यांचे प्रमाण वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या किटकांमुळं मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महानगरपालिका प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात यावी, अशी मागणी पुणेकर महानगरपालिकेकडे सातत्याने करत आहेत. मुळा-मुठा सुधार प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. या रखडलेल्या कामाचा फटका आता थेट नागरिकांना बसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. काहींनी या व्हिडिओवर कमेंट करत पालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, विरोधकांनी टीका करत याचा निषेध केला आहे. पालिकेने लवकरात लवकर नदीपात्रातील जलपर्णी काढली नाही तर आयुक्यांता जलपर्णी काढून त्यांच्या दालनात जाऊन भेट देण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.