पुणे : महापालिकेच २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठीच अंदाज पत्रक आज सादर झाले. महापालिकेचा ७ हजार ३९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. पुणे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यापासून ते स्वच्छातागृहे अधिक स्मार्ट करण्यावर भर देण्यात आला आहे. समान पाणीपुरवठा तसेच १३ ठिकाणी ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मारके, दवाखाने आदी ८६ योजनांसाठी १५५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.


विरोधकांकडून सत्ताधारी भाजप धारेवर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अंदाजपत्रकात उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या फोटोला योग्य स्थान देण्यात न आल्यानं विरोधी पक्षाच्या सभासदांनी चांगलाच गोंधळ घातला. अंदाजपत्रकातील सुरुवातीच्या एका पानावर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मात्र आतील पानावर छापण्यात आला आहे. ही बाब राजशिष्टाचार आला धरून नसल्याचं सांगत सत्ताधारी भाजपला धारेवर धरले. अखेर ही चूक झाली असल्याच सत्ताधाऱ्यांनी मान्य केलं. त्यानंतर वादावर पडदा पडला.  



पुणे आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय आराखड्यात तब्बल अकराशे कोटींची भर घालत स्थायी समिती अध्यक्षांनी ७ हजार ३९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर केला. पुणे महापालिकेचा  २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केला. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ६ हजार २२९ कोटींचा आराखडा सादर केला होता. त्यावर महसूल वाढ समितीचा सल्ला घेण्यात आला. त्यानुसार उत्पन्नाच्या बाजूत जाहिरात, बांधकाम, मिळकत कर तसेच कर्जाच्या माध्यमातून भर घालून अर्थसंकल्प अकराशे कोटींनी फुगवण्यात आला आहे. 


केवळ १० रुपयांत प्रवास


पुणे शहरात केवळ १० रुपयांत मिडीबसमधून फिरता येणार आहे. शहरात मध्यवस्तीत अनेक रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे ३२ आसनी असणाऱ्या मिडी बस  भाडेतत्वावर चालविण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये  


- एकूण अर्थसंकल्प - ७ हजार ३९० कोटी
- पर्यटनाला विशेष चालना 
- त्यांतर्गत जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहालय उभारणार
- त्यांतर्गत सारसबाग तसेच पेशवे पार्क एकत्रित करून आंतरराष्ट्रीय उद्यान उभारणार
- त्यांतर्गत मध्यवर्ती शहरात दहा रुपयांत वर्तुळाकार बससेवा देणार
- पुणे शहरात तीन अतिदक्षता रुग्णालय उभारणार
- स्मार्ट व्हिलेज योजना राबवणार
- महापालिका शाळेतील दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणार