Pune Nashik Highway Manchar Accident:  पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणामध्ये एका भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये 19 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. या प्रकरणात ज्या कारमुळे अपघात घडला ती कार अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या आमदाराचा पुतण्या चालवत होता अशी माहिती समोर येत आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेड-आळंदी मतदारसंघातून निवडून आलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांच्या पुतण्या मयुर मोहितेच्या फॉर्च्युनर काराने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले. हा अपघात मंचरजवळच्या एकलहरे गावाजवळ घडला. प्रथमिक माहितीनुसार मयुर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होता. मयुर मोहितेच्या कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार काही फूट अंतरावर फेकला गेला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी मयुर मोहिते कारमध्येच बसून असल्याचे कॅमेरात कैद झालं आहे. 


अपघात एवढा भीषण की  5 ते 10 फूट दूर फेकला मृत व्यक्ती


हा अपघात शनिवारी रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास झाला. आमदार पुतण्या मयुर मोहिते हा त्याच्या फॉर्च्युनर कारने नारायणगाववरुन मंचरच्या दिशेने जात होता. तर या अपघातात मरण पावलेला 19 वर्षीय ओम भालेराव हा मंचरकडून कळंबच्या दिशेने चालला होता. ओम हा मुळचा कळंबचा असल्याने त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनजवळ गर्दी केली. ओमच्या गावचे नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर मृत व्यक्ती 5 ते 10 फूट दूर फेकली गेली. या ठिकाणी आता सीसीटीव्ही उपलब्ध आहे का पोलीस याची चाचपणी करत आहे.


गावकऱ्यांनी केली गर्दी, कारवाईची मागणी अन् गुन्हा दाखल 


कळंबजवळच हा भीषण अपघात झाल्याने स्थानिक गावकरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं गोळा झाले होते. दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्युनंतर त्याच्या नातेवाईकांची पोलीस स्टेशनला धाव घेतली. दुचाकीस्वार तरुणाच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मयुर मोहितेविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एका स्थानिक तरुणाचा अशाप्रकारे बेदरकारपणे कार चालवणाऱ्या आमदार पुतण्याने चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये संताप आहे. मंचर पोलीस स्टेशनबाहेर रात्री मोठ्या संख्येनं गर्दी जमा झाली होती. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.