पुणे :  बोगस मतदार नोंदवायच काम यावेळी झालं आहे. मतदारांचा पत्ता वेगळा, सर्वांपुढे एकच नंबर असल्याचे सांगत निवडणूक आयोगाचं कुठंतरी चुकतंय असं विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. आम्हाला काल परवा याद्या दिल्या त्यात मतदार शोधायला गेले तर मिळत नाहीयेत. मतदार याद्या चुकीच्या, हरकत घ्यायला आम्हाला संधी दिली नाही, त्यात बदल करा असे देखील पाटील म्हणाले. लोकशाहीत मतदार यादीत चूका दुरुस्ती करुन निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले. लॉकडाऊन लवकर उघडा हे सल्ले देणाऱ्यांची संख्या मोठी होती मात्र गणपतीनंतर संख्या वाढली. आता दिवाळीत नागरिक बाहेर पडले त्यांची संख्या अजून दिसलेली नाही. ती दिसू नये हीच अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. टप्याटप्याने सर्व उघडावे ही सरकारची भूमिका होती. एकत्रित लोकं आल्यावर कोरोनाचा फैलाव होतो. शेवटचा टप्पा म्हणून धार्मिक स्थळ उघडी केल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या काळात मोदी साहेब सांगत होते ते ऐकले. त्यांचे सगळे नाद केले. थाळ्या, टाळ्या बडवल्या मात्र राजकारण केलं नाही मात्र राज्यात भाजपाने राज्यात राजकारण केल्याचे पाटील यावेळी म्हणाले. यावेळी जयंत पाटलांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. पुण्यात चंद्रकांत दादांनी पुढे येऊन पदवीधरांचे किती प्रश्न मांडले ? हे मेधा कुलकर्णी यांना जरी विचारलं तरी त्या सांगतील असे ते म्हणाले.  देवेंद्र फडणीविसांना राष्ट्रवादी कधी टरबूज्या म्हणत नाही तर  चंद्रकांत दादांच्या नावांचा शॉर्टफोर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये असा चिमटा जयंत पाटलांनी चंद्रकांत दादांना लगावला.



भाजप बरोबर मागच्यावेळी शिवसेना होती म्हणून त्यांचा विजय झाला. आता सेना बरोबर नाही त्यामुळे त्यांचा विजय होणार नसल्याचे पाटील म्हणाले. 


मतदार याद्या उशिरा जाहीर झाल्या. दुबार नावे, एकच मोबाईल नंबर, पत्ते चुकीचे होते. प्रचार यंत्रणा पोहचू नये यासाठी कुणीतरी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात निवडणुकाकडे तक्रार अर्ज करणार असल्याचे पाटील म्हणाले. 


यावेळी जयंत पाटील यांनी फडणवीस-पवार शपथविधीवर देखील भाष्य केले. राज्यपालसुद्धा आता पहाटे काही करत नसतील. राजकारणात अशा गोष्टी चालतात. कटू आठवणी नको आता असे ते म्हणाले. 


वीजबिलासंदर्भात बोलताना राज्यावर ६७ हजार कोटींची थकबाकी आहे. असलेल्या अवस्थेला दुरुस्तीच काम करणार आहोत. व्यवस्था टिकणे महत्वाचे असून आम्ही मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहोत. मागच्या सरकारने काम केलं असतं तर ही वेळ आली नसती असे ते म्हणाले. 


तसेच लॉकडाऊन हा फिजिबल पर्याय नाही. सामान्य माणसांच्या आरोग्याचा विचार करायची गरज आहे. त्यामुळे सरकार याबाबत लवकरच विचार करेल असे ते लॉकडाऊनसंदर्भात बोलताना म्हणाले.