Pune News Today: दोघे एकाच रूमवर राहायचे. एक होता 37 वर्षाचा तर दुसरा 19 वर्षाचा. वयाने मोठा असणारा सतत दुसऱ्यावर रुबाब दाखवायचा. घरातली सर्व कामे त्यालाच सांगायचा. स्वयंपाक करायला लावायचा. भांडी घासायला लावायचा. रूम साफ करण्याची जबाबदारी ही त्याच्यावरच टाकायचा आणि काही चुकलं की मारहाणही करायचा. या सर्वाला कंटाळून छोट्याने अखेर मोठ्याचा खून केला. हा सर्व प्रकार घडलाय पुण्यातील कोंढवा परिसरात. कुठलाही पुरावा मागे नसताना अवघ्या काही तासात कोंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नसीम सइदुल्लाह खान (वय ३७ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. कुशीनगर उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कमल रोहित ध्रुव (वय १९ वर्षे, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे, मुळ रा. छत्तीसगड) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून जवळच एका निर्जन ठिकाणी पोलिसांना मंगळवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मारहाण करत गळा चिरुन त्याचा खून करण्यात आला होता. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मयत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याने शेवटचा फोन कमल ध्रुव याला केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी कमल ध्रुव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनेच खून केल्याची कबुली दिली.


मयत आणि आरोपी कोंढवा परिसरात टाइल्स फिटिंगचे काम करतात. ज्या ठिकाणी त्याचे काम सुरू आहे त्याच परिसरातच त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोघांचीही राहण्याची व्यवस्था एकाच खोलीत करण्यात आली होती. वयाने मोठा असणारा नसीम कमलला सारखा त्रास द्यायचा. घरातील सर्व कामे त्यालाच करायला लावायचा. इतकाच नाही तर दारू पिऊन मारहाण करायचा. सोमवारी रात्रीही नसीम याने ध्रुव त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण केली आणि घराच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर आरोपी ध्रुव हा देखील त्याच्या पाठोपाठ गेला आणि त्याला मारहाण करत गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर काही घडलंच नाही अशा अविर्भावात येऊन तो पुन्हा रूमवर झोपी गेला. मात्र मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासात कोंढवा पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत आरोपी ध्रुव याला अटक केली


ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी अमोल हिरवे, विशाल मेमाने, लवेश शिंदे, विकास मरगळे, शशांक खाडे, अभिजीत रत्नपारखी, राहुल वंजारी यांच्या पथकाने केली आहे.