सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) काही हॉटेल, पब चालकांनी 'अरेबियन नाईट्स' च्या (arabian nights) नावे विदेशी तरुणींच्या नृत्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर नृत्याचे हे कार्यक्रम मद्यधुंद रात्र जागवत पहाटेपर्यंत होत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अशा कार्यक्रमांची जाहिरात करून ऑफर्सची खैरात केली जात असल्याचे समोर आलं आहे. तरुण-तरुणींना आकर्षित करून रात्रीच्या मैफिली सुरु असल्याचा प्रकार पुण्यात सुरु आहे. त्यामुळे पुण्यातही आता डान्सबारची (Dance Bar) छमछम सुरू असल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसेंदिवस पुण्यात नाईट कल्चर वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच पब संस्कृती फोफावत चालली आहे. रात्री उशिरापर्यंत मद्याचा पेला रिचवत संगीताच्या तालावर बेधुंद होऊन झिंगाट तरुणाई पुण्यात वावरताना दिसत आहे. खातरजमा न करता, अल्पवयीन मुला-मुलींनासुद्धा याठिकाणी सहज प्रवेश दिला जातो. विविध ऑफर्स देऊन हॉटेल, पब व्यावसायिकांकडून तरुणाईला आकर्षित केले जाते. त्यासाठी काही ग्रुप काम करत आहेत. त्यातूनच आता मद्याबरोबरच विदेशी तरुणींच्या नृत्याची मेजवानी देण्यास हॉटेल्स, पबवाल्यांनी सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे विदेशातील तरुणीच्या नृत्याची मोठी जाहिरात करून ग्राहकांना हे हॉटेल व्यावसायिक आपल्याकडे आकर्षित करत आहेत.


पोलिसांची पूर्वपरवानगी आणि व्हिसाच्या निर्धारित नियमानुसार विदेशी तरुणींच्या नृत्याचे कार्यक्रम हॉटेल, पबवाल्यांना आयोजित करता येत नाहीत असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या तरुणी भारतात पर्यटन व्हिसावर येतात. त्यांना इथे आल्यानंतर कोणताही व्यवसाय करण्यास परवानगी नाही. मात्र, त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम राजरोस जाहिरात करून पब, हॉटेलवाले आयोजित करत आहेत. त्यातूनच हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय वाढल्याचेही सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे  पुण्यातील स्पा, मसाज सेंटरमध्येही विदेशी तरुणींचा राबता आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या सेवेला येथे येणाऱ्या ग्राहकांकडून मोठी पसंती आहे. स्पा, मसाज सेंटरवाल्यांकडून नियमांना फाटा देत राजरोस अर्थकारणाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आणि संबंधित इतर विभागांच्या निदर्शनास कसा येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 


वेसण कोण घालणार?


रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अशा कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांना कर्णकर्कश आवाजाबरोबरच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोरेगाव पार्क, भारती विद्यापीठ, बंडगार्डन परिसरात तर पब, हॉटेलची मद्यधुंद पहाट संपल्यानंतर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेकदा येथे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नियमांना बगल देत मद्यधुंद रात्र जागवणाऱ्या हॉटेल, पबचा व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे या पबवाल्यांना वेसण कोण घालणार, असा सवाल उपस्थित होत आहे.


मद्यधुंद रात्रीला विदेशी ललनांची मैफल


काही दिवसांपूर्वी एका विदेशी तरुणीने राष्ट्रध्वजाचा अवमान केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत संबंधित तरुणीच्या विरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच दिवसांपूर्वी दक्षिण उपनगरातील एका हॉटेलमध्ये मोठी जाहिरात करत 'अरेबियन नाईट्स' च्या नावे विदेशी तरुणींच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी देखील नियमांना तिलांजली देत स्थानिकांच्या वरदहस्तामुळे असे अनेक कार्यक्रम झाले आहेत. मात्र, या वेळी त्याची खबर पोलिसांना लागली. त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक पोलिसांच्या कृपाशिर्वादाने असे  नृत्याचे कार्यक्रम होत असल्याची चर्चा आहे.