Pune Fire : पुण्यात मोठी दुर्घटना..! विमाननगरच्या फिनिक्स मॉलला भीषण आग
Pune Phoenix Mall Fire : पुण्यातील प्रसिद्ध अशा फिनिक्स मॉलला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Viman Nagar Phoenix Mall Fire : शुक्रवारी पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध अशा फिनिक्स मॉलला मोठा आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेची माहिती पुणे महापालिका अग्निशमन विभागाला दुपारी 3.32 च्या सुमारास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 5 अग्निशमन वाहने, 2 टँकर आणि 1 हायड्रोलिक प्लॅटफॉर्म घटनास्थळी रवाना करण्यात आले. दुपारी 4.32 पर्यंत ही आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे. सध्या आग नियंत्रणात आली असून कोणतीही जीवितहानी नाही. काही लोकांना किरकोळ भाजल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मॉलमध्ये बंद असलेल्या एका जुन्या रेस्टॉरंटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जातंय. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली? याची पक्की माहिती मिळाली नाहीये. फिनिक्स मॉल सारख्या मोठमोठ्या मॉलमध्ये कायमस्वरूपी असे फायर अटेंडन्ट असतात, लाखो रुपये खर्च करुन बसवलेली फायर सिस्टीम चालू का झाली नाही? असा सवाल विचारला जात आहे.
पाहा Video
पुण्यात उन्हाचा तडाखा
गुरुवारी पुण्यातील राजकीय तापमानाचा पारा शिगेला पोहोचलेल असतानाच प्रत्यक्षातील तापमानानेदेखील नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय. पुण्याच्या हडपसर मध्ये राज्याचे सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी झाली. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचा पारा 40 अंशाच्या वर आहे. प्रचंड उष्णता आणि उकाड्यामुळे पुणेकरांचा दाह सुरू होतोय. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच पुण्यात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान जाणवत आहे. पुण्यात गुरुवारी एप्रिल मधील गेल्या दोन वर्षांमधील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर मध्ये 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं तर राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद हडपसर मध्ये झाली. हडपसर मध्ये काल 43.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं.