सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश मंडळांपासून ढोल ताशा पथकापर्यंत (Dhol Tasha Pathak) सर्वांचीच जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील (Pune News) ढोलताशा पथके ही गणेशोत्सवात खास आकर्षण असतात. मात्र या ढोलताशा पथकामुळे एका आजीने तिच्या नातवाला बेदम मारहाण केली आहे. ढोल ताशा पथकात जातो म्हणून मुलाच्या आजीने आणि आत्याने त्याला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आजी आणि आत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यातील ढोलताशा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढोल-ताशा पथकाच्या सरावावरुन घरी येण्यास उशीर झाल्याने 11 वर्षीय मुलाला त्याची आत्या आणि आजीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल घुले यांच्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी आत्या व आजीवर बाल संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.


नेमकं काय घडलं?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई विठ्ठल घुले आणि त्यांचे सहकारी येरवडा येथील प्रकाशनगरमध्ये गस्त घालत असताना दोन व्यक्तींनी त्यांना दोन महिला एका लहान मुलाला बेदम मारहाण करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेच्या घरी जात विचारपूस केली. तेव्हा दोन्ही महिलांनी जोरजोरात आरडा ओरड आणि शिवीगाळ करून आमची तक्रार कोणी केली, त्याचे नाव सांगा अशी उलट विचारणा पोलिसांकडे केली. त्यावेळी घरातील एका ड्रमजवळ बसून एक मुलगा रडत होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता 11 वर्षीय मुलाने सांगितले की, तो ढोल-ताशा पथकात जातो. त्यामुळे घरी यायला उशीर झाला म्हणून आत्या आणि आजीने पाईपने मारहाण केली.


पुण्यात ढोलताशा पथकांच्या सरावाने नागरिक हैराण


दरम्यान, पुण्यात सध्या सार्वजनिक ठिकाणी ढोल-ताशा पथकांचा जोरदार सराव सुरु आहे. बहुतांश ठिकाणी विनापरवानगीच सराव सुरू आहे. ढोल ताशा पथकांचा सराव तीन-चार तासांहून अधिक तास चालत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी, रुग्णालयातील रुग्ण तसेच अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.