कैलास पुरी, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pune Koyta Gang: पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात दिवसेंदिवस कोयत्या गँगची (Koyta gang Pune) दहशत वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर परिसरात एका व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. तर, अनेक वाहनांची तोडफोडदेखील केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी लगेचच अॅक्शन घेत आरोपींना ताब्यात घेत दणका दिला आहे. जिथे आरोपींनी दहशत माजवली तिथूनच पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. (Pune Koyta Gang News)


काही दिवसांपूर्वी रुपीनगर परिसरात कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या तरुणांना दुकानदाराने चप्पल दुकानाबाहेर काढण्यास सांगितलं होतं. त्यावरुन आरोपींनी राग मनात धरून दुकानदारावर कोयत्याने हल्ला केला होता. तसंच, परिसरातील गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई केली आहे. 


चिखली पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली. सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. विशेष म्हणजे या आरोपींनी ज्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तिथेच त्यांची खोड मोडली आहे. पोलिसांनी या गावगुंडाना कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. तसंच, परिसरातून आरोपींची धिंडदेखील काढली. कायदा हातात घेणाऱ्या आरोपींवर अशीच कारवाई करण्यात येईल, असा इशाराच पोलिसांनी या निमित्तांनी दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



पुणे शहर पोलिसांकडून नवीन व्हॉट्सॲप क्रमांक 


एका बाजूला शहरात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असून आता तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे. आता पुणे शहरातील नागरिक थेट पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार करू शकतात. पुणे शहर पोलिसांकडून आता तक्रार करण्यासाठी नवीन व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 8975953100 या नंबरवर कोणीही कधी ही तक्रार करू शकता.


पोलीस आयुक्त व्हॉट्सॲप नंबर सेव्ह करून तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार असून तातडीच्या सेवेसाठी ११२ डायल करा असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.