Pune Crime News : पुण्याचं ससून हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. ससूनमधले डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या अंधारात चक्क निर्जनस्थळी सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी डॉक्टरांचे हे काळे धंदे उजेडात आणले. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, पुणे पोर्श कार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणे, असे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता ससूनच्या डॉक्टरांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. 


ससूनच्या डॉक्टरांचा धक्कादायक प्रताप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश गायकवाड ससून हॉस्पिटलबाहेर उभे असताना डॉक्टर आदीकुमार तिथं आले. रितेशला रिक्षाचालक समजून त्यांनी बोलायला सुरूवात केली. एका रुग्णाला सोडून यायचं आहे, येणार का? अशी विचारणा डॉक्टरांनी केली. कुठं सोडायचं आहे? असा सवाल गायकवाडांनी केला. इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी नेऊन सोड, असं डॉक्टरांनी सांगितलं. नेमकं कुठं सोडू ? मी एकटा कसा सोडवू? नातेवाईक पाहिजे सोबत, असे गायकवाड म्हणाले. तेव्हा 'तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला 500 रुपये दिले की बरोबर सोडून येतो,' असं डॉक्टरानी सांगितलं. काही वेळानं दोन्ही पाय नसलेला, हातात सुई आणि विविध ठिकाणी जखमी झालेल्या एका रुग्णाला कर्मचाऱ्यांनी रिक्षात आणून बसवलं. डॉक्टर आदिकुमार आणि त्यांचा सहकारी स्वतःच्या कारमधून सोबत आले. विश्रांतवाडीजवळ एका वडाच्या झाडाखाली रात्रीच्या अंधारात, भर पावसात रुग्णाला सोडून डॉक्टर रात्री दीड वाजता निघून गेले.



रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाडांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला आणि पोलिसांकडे त्याची तक्रार केली. या धक्कादायक घटनेनंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर ससूनचे डीन एकनाथ पवार यांनी याप्रकरणी डॉक्टर आदीकुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीय. ड्रग्ज माफिया ललित पाटीलशी ससूनच्या डॉक्टरांचे संबंध उघड झाले होते. पुणे पोर्श कार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा धक्कादायक प्रताप ससूनच्या डॉक्टरांनी केला. आता रुग्णाच्या जीवाशी खेळ करण्याचा हा प्रकार समोर आल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.