धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका, पण मृत्यूपूर्वी 25 प्रवाशांचा जीव वाचवला
पुणे-सातारा हायवेवर मृत्यूचा थरार, धावत्या बसमध्ये एसटी चालकाला हृदय विकाराचा झटका
निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : सातारा हायवेवर एसटी बस चालकाचा हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय. पण मृत्यूपूर्वी प्रसंगावधान दाखवत त्याने बसमधल्या 25 प्रवाशांचे प्राण वाचवले. जालिंदर पवार असं एसटी बस चालकाचं नाव असून सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली.
राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. बुधवारी वसई वरून आलेली एसटी बस दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात पोहचली. यावेळी बस चालक संतोष कांबळे यांना बदली चालक म्हणून जालिंदर पवार आले.
पुणे - सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्या नंतर बसचा वेग मंदावला. मुळचे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील पळशी गावच्या 45 वर्षाच्या जालिंदर रंगाराव पवार या बसचालकाला चक्कर येऊ लागली. वेळीच प्रसंगावधान दाखवून रंगाराव पवार यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतली.
वाहकाने चालकाला विचारणा केली, तेंव्हा चक्कर येतं असल्याचं सांगत चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. वाहकाने पवार यांना पुन्हा आवाज दिला, मात्र चालकानी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वाहकाने प्रवाशांच्या मदतीने पवार यांना नसरापूर इथल्या एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेलं. मात्र उपचारासापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. बस चालकाच्या जाण्याने सहकारी st कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जातेय.