अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Pune Rain) इथं मान्सून गोव्यात पोहोचला असून, महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon) मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये या मान्सूनपूर्व पावसानं काही भागांना झोडपल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यालाही अशाच पावसाचा तडाखा बसला. पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळं शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठिकाणी पाणी साठल्याने रस्त्यावरील गाड्या वाहून गेल्या, तर काही ठिकाणी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं.  पुण्याच्या कात्रज, धानोरी, विमान नगर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.  पद्मावती परिसरात चक्क एक दुचाकीस्वार पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असल्याचा व्हिडीओही लगेचच व्हायरल झाला. तर धानोरी चौक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली होता. अवघ्या काही वेळाच्या पावसानंतर इथं रस्त्यावर पूरजन्य परिस्थिती पाहिला मिळाली. बुधवारी पुण्याच्या या भागात दोन तासात 100 मिलिमीटरहून जास्त पावसाची नोंद झाली. 


तिथं वडगाव शेरीत 114 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. शहरात इतर ठिकाणी देखील पावसानं जोरदार हजेरी लावली, ज्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्या- नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. इथं काही भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी गेलं, इतकंच नव्हे, तर 
पावसामुळे पुण्यातील पावसाळी गटारांची लक्तरं बाहेर पडली. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : मान्सूनची गोव्यापर्यंत मजल; मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरींना सुरुवात 



अनेक उड्डाणं रद्द... 


पुण्यातील पावसामुळं विमानांची अनेक उड्डाणंही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोहगाव, धानोरी परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे पुणे विमानतळावरील विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याचं आढळलं, ज्यामुळं पुण्याहून उड्डाण करणाऱ्या पाच विमानांना एक ते चार तास उशीर झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी देहरादून, लखनऊ, दिल्ली, बंगळूरुला जाणाऱ्या प्रवशांचे हाल झाले. 


मुंबईतही पाऊस 


बुधवारी संध्याकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाळी वातावरण झालं असून, गुरुवारी सकाळी शहरातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. घाटकोपर, सायन, दादर या भागांमध्ये रिमझिम पाऊस झाला, तर अनपेक्षितपणे आलेल्या या पावसामुळं मुंबईकरांची त्रेधातिरपीट झाल्याचं पाहायला मिळालं.