धक्कादायक! महिलांच्या प्रसुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा गाई म्हशींवर वापर
आता गाई, म्हशी दूध देण्याआधीच त्यात भेसळ केल्याचा प्रकार समोर आलाय
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : दुधात (Milk) भेसळ केली जात असल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. सणासुदीच्या काळात ही भेसळ अधिकच वाढते. भेसळयुक्त दुधामुळे (Adulterated milk) शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आजकाल पिशवी बंद दुधातही भेसळ केली जात आहे. त्यामुळे ही भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. आधी ही भेसळयुक्त दूधाची विक्री केली जात होती. मात्र आता गाई, म्हशी दूध देण्याआधीच त्यात भेसळ केल्याचा प्रकार समोर आलाय.
गायी, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी महिलांच्या प्रसूतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ''ऑक्सीटोसीन'' इंजेक्शनची जिल्ह्यात सर्रास विक्री केले जात असल्याच समोर आलं आहे . हे इंजेक्शन दिलेल्या गायी, म्हशींचे दूध मानवी आरोग्यास हानीकारक असून त्याची सर्सास विक्री केली जात आहे. या इंजेक्शनची बेकायदा निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळीला अमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करुन अटक केली आहे. त्यांच्याकडून 52 लाखांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
समीर कुरेशी, विश्वजीत नाना, मंगल गिरी, सत्यजीत मोंडल, श्रीमंत हल्दर आणि बाबुभाई उर्फ अल्लादीन (सर्व रा. कलवड वस्ती) अशी अटक आरोपींची नावे आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने निरीक्षक सुहास तानाजी सावंत यांनी फिर्याद दिली आहे.
ऑक्सीटोसीन इजेक्शंन काय आहे?
महिलांच्या प्रसूती दरम्यान डॉक्टर या ऑक्सीटोसीन इंजेक्शनचा वापर करतात. यामुळे प्रसूती वेदना कमी होतात. मात्र हे इंजेक्शन गायी, म्हशींसाठी वापरल्यास त्या जास्त प्रमाणात दूध देतात. याचा वापर मानवाव्यतिरीक्त इतरत्र करण्यास कायद्याने बंदी आहे. तसेच हे इंजेक्शन तयार करण्यासाठी आणि विक्रीसाठी औषध व सौंदर्यप्रसाधन कायद्यानुसार परवाना आवश्यक असतो.
अटक केलल्या आरोपींकडे कोणताही परवाना नसताना ते इंजेक्शनची बेकायदा निर्मिती आणि विक्री करत होते. याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने सयुंक्त कारवाई केली. अधिकाऱ्यांनी कलवडवस्ती येथील एका पत्र्याच्या शेडवर छापा मारुन इंजेक्शन निर्मितीसाठी लागणारे केमिकल आणि इतर साहित्य जप्त केले. तसेच पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे औषध निर्मिती आणि विक्रीचा कोणताही परवाना नव्हता.
गोठ्यात जाऊन इंजेक्शनचा पुरवठा
दरम्यान याप्रकरणी तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी सांगितले, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते शहर आणि ग्रामीण भागातील गोठ्यांमध्ये जाऊन इंजेक्शनची विक्री करत होते. अनेकदा गोठा मालकही त्यांच्याकडे येऊन इंजेक्शन घेऊन जात होते. या इंजेक्शनने दूध वाढत असल्याचे लक्षात आल्यावर आरोपींकडे ग्राहकांचा ओघ वाढू लागला होता. इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या 50 ऍम्बूसचे (केमिकल असलेली बाटली) बॉक्स ते 100 रुपयांना विक्री करत होते. यातील एकाच आरोपीने फक्त 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. तर इतर आरोपी अशिक्षित आहेत. याप्रकरणी इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.