COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : पुण्यामध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राज करण पट्टीलाल आणि मनोजकुमार झल्लार सरोज या तरुणांना अटक करण्यात आलीय. दोन्ही मजुरी करतात. त्यांनी सुमारे 100 ते 150 व्हिडीओज युट्युब वर अपलोड केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड झाल्याची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने पुणे पोलिसांना कळवली होती. त्यानुसार सायबर शाखेने ज्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरून हे व्हिडीओ अपलोड झाले त्याच्या यु एल आर नंबर वरून आरोपींच शोध घेतला.


पुण्यातून हे व्हिडीओ अपलोड झाल्याची माहीती केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळाली होती. गुगलने ही माहिती केंद्र सरकारकडे ही माहिती दिली होती. आपल्या देशात २५ हजार चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड झाले असून पुण्यातून दिडशे व्हिडीओ अपलोड केल्याची यात माहिती होती. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. हे व्हिडीओ त्यांनी स्वत: तयार केले की कुठून घेऊन नंतर अपलोड केले ? याचा तपास पुणे पोलीस घेत आहेत.



देशात गेल्या ५ महिन्यात २५ हजार चाईल्ड पोनोग्राफीच्या घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेतील 'चाईल्ड सेंटर ऑफ मिसिंग अँड एक्सप्लोयटेड children' या संस्थेच्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.


चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात कार्यरत असलेल्या 'चाईल्ड सेंटर ऑफ मिसिंग अँड एक्सप्लोयटेड children' या संस्थेच्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. गेल्या पाच महिन्यांतील ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी पाहता पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे हे पॉर्नोग्राफी व्हिडिओ सोशल मीडियात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.


महाराष्ट्रातील १७०० प्रकरणांचा तपास करण्यासाठी राज्याच्या सायबर विभागाने 'ऑपरेशन ब्लॅकफेस' मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत चाईल्ड पॉर्नोग्राफी तयार करण्याखेरीज याबाबत माहिती गोळा करणं, माहिती सर्च करणं, माहिती ब्राऊझ करणं, डाउनलोड करणं, एक्सचेंज करणं, माहिती वितरित करणं हे देखील गुन्हे आहेत.


लहान मुलांवर अशाप्रकारे पॉर्नोग्राफी बनवणारे भरपूर पैसे कमवतात, अशा पॉर्नोग्राफीद्वारे आपली वासना शमवणारे विकृत असतात. ज्या मुलांवर ही पॉर्नोग्राफी बनवली जाते त्यांच्या मानसिकतेवर आयुष्यभर वाईट परिणाम होत असल्याचं मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटलं आहे.


परदेशात इंटरनेटवर अश्लील चित्र आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाते आणि त्यांना शोधून कठोर शिक्षाही केली जाते. भारतातही अशा प्रकारे विकृत लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.


मुलं म्हणजे देवघरची फुलं असं म्हटलं जातं. मात्र काही लहान मुला- मुलींचं बालपण अशा पद्धतीने कुस्करुन टाकलं जातं. अशा विकृतीला संपवण्यासाठी आपण सर्वांनीच कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.