पुण्यातील कसबा पेठेतील `या` भागात कलम 144 लागू; पोलिसांनी दिला इशारा
Pune News Today: पुण्यातील काही परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरुन काही दिवसांपूर्वी वाद सुरू होता.
Pune News Today: पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरुन काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठा वाद झाला होता. त्यामुळं कसबा पेठेत तणाव वाढला होता. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सहआयुक्त यांनी पवळे चौक ते कुंभार वेस चौक दरम्यान 144 (1) कलम लागू करण्यात आले आहे. तसंच, सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही कारवायांना आळा घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं पवळे चौक ते कुंभार वेस चौक, भोई गल्ली, कागडीपुरा, कुंभारवाडा, आलोकनगर सोसायटी आणि अग्रवाल तालीमसह ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
कलम 144 लागू करण्यात आलेल्या ठिकाणांबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता धार्मिक विधी किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. समाजात सलोखा राखण्यासाठी या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. धार्मिक भावना दुखावणारी किंवा आंतरगट संघर्ष भडकावणारी कोणतीही कृती किंवा वक्तवे रोखण्यासाठी नियम निश्चित्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफवा पसरवणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणे, पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक मेळावे घेणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे, या सर्वांवर 10 एप्रिल 2024पर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्याचा वाद खूप दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळं आता आणखी कोणता वाद पेटू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांचा बंदोबस्तदेखील या परिसरात तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनीही नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.