पुणे :  पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  पुण्यातील धानोरी ( Pune Police) येथे भर रस्त्यात पोलीस आणि चार पाच जणांमध्ये गाडी काढण्यावरून चांगलाच वाद पेटला. वाद शिगेला पोहचल्यानंतर तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?


पोलीस कर्मचारी प्रदीप मोटे (Pradeep Mote) यांनी धानोरी जकात नाका परिसरात दुचाकी लावली होती. त्यावेळी मोटे यांनी गाडी रस्त्यावर उभी केली. त्याचवेळी कालिदास खांदवे (Kalidasa Khandve) नामक व्यक्ती गाडी लावण्यासाठी आले. कालिदास खांदवे यांनी गाडी बाजूला घे म्हणून पोलीस कर्मचारी मोटे यांना सांगितलं. गाडी काढण्यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला.


बघता बघता वाद एवढा पेटला की, मोटे यांनी खांदवे यांना मारहाण केली. यानंतर खांदवे यांना राग अनावर झाला आणि खांदवे यांच्यासह पाच सहा जणांनी मिळून पोलीस प्रदीप मोटे यांना वीट ब्लॉकने मारहाण केली. किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून बेदम मारहाण करण्यात आली. 


हाणामारीची ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे. मारहाणीत पोलीस कर्मचारी मोटे हे गंभीर जखमी झाले आहेत. मोटे हे विमानतळ पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत.


दरम्यान, या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपी कालिदास खांदवे यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून मारहाण करणारे सर्व आरोपी हे फरार आहेत. पोलिसांकडून खांदवे आणि पाच साथिदारांचा शोध घेतला जात आहे.