40 हजारांच्या कर्जापायी सावकारानं लुटलं...70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर आली रस्त्यावर भीक मागण्याची वेळ
16 हजारांचं पेन्शन असून 70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ... नक्की काय घडलं पाहा
सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे : आजही काही भागांमध्ये सावकारी चालू आहे. सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडता फेडता हाल होतात. अनेकदा कर्जबाजारी होऊन जमीन घर सगळंच हिरावलं जातं. बेकायदा सावकारीमुळे एका वयोवृद्ध महिलेचं छप्पर गेलं आणि भीक मागायची दुर्देवी वेळ आली. सावकारीच्या कचाट्यात सापडलेल्या या महिलेला कर्ज फेडता फेडता रस्त्यावर झोपण्याची वेळ आली.
बेकायदा सावकारीमुळे वयोवृद्ध महिलेवर भीक मागण्याची वेळ आली. जागरूक नागरिक आणि खडक पोलिसांमुळे या ज्येष्ठ महिलेची बेकायदा सावकारी करणाऱ्याच्या कचाट्यातून सुटका झाली. या सावकाराने 40 हजार रूपये कर्जाच्या बदल्यात वृद्ध महिलेकडून तब्बल 8 लाख रूपये उकळल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सावकाराला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार ७० वर्षीय महिला राहते. त्यांना दोन मुली असून पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्या महापालिकेतून सफाई कामगार म्हणून निवृत्त झाल्या. या वृद्ध महिलेनं 5 वर्षांपूर्वी नातीच्या उपचारासाठी आरोपी दिलीप विजय वाघमारेकडून ४० हजार रूपये कर्ज घेतलं होतं.
वृद्ध महिलेनं बँकेतून कर्ज काढून 40 हजार रूपये दिले. त्याचबरोबर व्याजापोटी एक लाख रुपये दिले. तरीही तिच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा आरोपीने घेतला. महिलेच्या नावे असलेले बँकचे पासबुक, दोन एटीएम कार्ड आरोपीन स्वतः कडे ठेऊन घेतले. महिलेला दर महिना १६ हजार रूपये पेन्शन जमा होत होती.
या महिलेच्या पेन्शनवरही आरोपीचा डोळा होता. आलेल्या पेन्शनमधून 2 हजार रुपये जेमतेम जीवावर येऊन आरोपी महिलेच्या हातात टेकवायचा, बाकी सगळे पैसे स्वत: हडप करायचा. त्यामुळे महिलेचा वैद्यकीय आणि दैनंदिन खर्च भागत नव्हता. या महिलेवर भीक मागण्याची वेळ आली होती. त्या दररोज सारस बागेसमोर भीक मागत होत्या. या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याकडे सहज चौकशी केली. त्यावेळी त्यांनी हा सर्व प्रकार सांगितला.
ती व्यक्ती थेट त्या महिलेला खडक पोलीस ठाण्यात घेऊन आली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी भैरट यांनी हा प्रकार ऐकून घेतला. त्यानंतर त्यांनी आरोपी वाघमारे याच्यावर बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली. त्याला न्यायालयाने पोलूस कोठडी सुनावली. या आरोपीने आतापर्यंत वृद्ध महिलेकडून ४० हजाराच्या बदल्यात ८ लाख रुपये घेतल्याचं समोर आलं.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीकडून पोलिसांनी वृद्ध महिलेचं पासबुक जप्त केलं आहे. आरोपीनं आणखी कोणाला फसवलं का? याचा तपास पोलीस करत आहेत.