हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : वर्षभर शेतात काबाड कष्ट  केल्यानंतर शेतमाल काढणीची वेळ आली असताना उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव,जुन्नर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवत शेतीमालाचे प्रचंड नुकसान केलंय तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीच वाहून गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आधीच भीषण दुष्काळाने पिडलेला बळीराजा शेतकरी पुरता हतबल झालेला असताना ऐन पावसाळ्यात शेतकरी आनंदीत होण्याऐवजी रडकुडींला आलाय.कांदा टॉमॅटो फ्लॉवर कोबी सोयाबीन ज्वारी मका यांसारख्या पिकांचं अतिवृष्टी ने प्रचंड नुकसान झालंय. वादळाने शेतकरऱ्याच्या घराचे छत उडून गेलंय काही शेतकऱ्यांना ईजा झालीय तर झाडांची ही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून ऊसांची शेतीही भुईसपाट झाली आहे.
 
आधीच कर्ज माफी नाही आणि निसर्गाच्या लहरीपनामुळे हतबल झालेल्या बळीराजा ने सावकाराचे उंबरठे झिजवून पीकंची लागवड केली परंतू परतीच्या पावसाने बळीराजा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालवली आहे. त्यामुळे सरकार आता तरी आमच्या नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करेल आणि काहीतरी आर्थिक मदत करेल आशी भाबडी आशा बळीराजा शेतकरी करतोय. 


उभ्या जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी पुरता हतबल झालेला असताना लोकप्रतिनिधी सत्तेचा खेळ खेळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे प्रशासन कागदी घोडे नाचवतय. त्यामुळे मायबाप सरकारने बळीराजा पुरता उध्वस्त होण्याआधीच त्याची अवहेलना थांबवावी अशी आर्त हाक कष्टकरी वर्ग करत आहे.