पुणे : संपूर्ण पुणे शहरात २४ तास तसंच समान पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना पुणे महापालिकेनं हाती घेतलीय. पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीनं या प्रस्तावास मान्यता दिलीय. अशा प्रकारे निधी उभारणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेचा एकूण खर्च ३३०० कोटी आहे. त्यापैकी केंद्राकडून ५०० कोटींचे अनुदान मिळणार आहे. महापालिका स्वतःचे ५५० कोटी रुपये लावणार आहे. उर्वरित २२६४ कोटी रकमेसाठी कर्जरोखे उभारण्यात येणार आहेत.


पहिल्या टप्प्यात २०० कोटींचे कर्जरोखे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर गरजेनुसार कर्जरोखे घेण्यात येणार आहेत. सेबीच्या निर्बंधांमुळे गेल्या १० वर्षात कोणत्याच महापालिकेनं कर्जरोखे काढलेले नाहीत.


अलीकडच्या काळात हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार देशातील पुण्यासह अहमदाबाद तसेच विशाखापट्टणम महापालिकांकडून कर्जरोख्यांसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं पुण्याच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता दिल्यास पुणे ही कर्जरोखे उभारणारी देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.  


महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं बहुमताच्या जोरावर या प्रस्तावाला मंजुरी मिळवलीय. त्याला राष्ट्रवादीनंही पाठींबा दिलाय. असं असताना काँग्रेस तसेच शिवसेनेनं या निर्णयाला विरोध दर्शवलाय. ही संपूर्ण योजना भ्रष्टाचारानं माखल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तर हा महापालिकेला कर्जबाजारी करण्याचा प्रकार असल्याचं शिवसेनेनं म्हंटलय.