दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्य शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातंर्गत (एसईबीसी) मराठा समाजाला दिलेल्या १३ टक्के आरक्षणानुसार नोकरीमध्ये नियुक्त्या देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ब मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्तपदांवर मराठा समाजातील ३४ जणांची एसईबीसी प्रवर्गातील १३ टक्के कोट्यातून नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम खाते हे एसईबीसी आरक्षणाची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी करणारा विभाग ठरला आहे. 


मराठा समाज आरक्षण कायदा नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू झाल्यानंतर शासनाने हा महाभरतीचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. मा. न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये एसईबीसी प्रवर्गातून १३ टक्के आरक्षण देण्याचा निकाल दिला. 


त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या ४०५ संभाव्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ३०० पदांचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये एसईबीसी प्रवर्गातील ३४ उमेदवारांना नियुक्ती करण्यात आली आहे. 


राज्यात मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण लागू झाल्यानंतर सुरू केलेल्या भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. इतर पदांसाठीच्या भरती  प्रक्रियेमध्येही मराठा समाजासाठीच्या एसईबीसी प्रवर्गातील इतर रिक्त पदे देखील तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.