यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्याचे प्रमाण घटले
यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात निर्माल्य आणि थर्माकॉलचा वापर कमी प्रमाणात झाल्याच आढळून आलंय. गणेशोत्सव काळात ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि घनकचरा विभागाच्या सहाय्यानं निर्माल्य संकलन मोहीम राबवते.
ठाणे : यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात निर्माल्य आणि थर्माकॉलचा वापर कमी प्रमाणात झाल्याच आढळून आलंय. गणेशोत्सव काळात ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि घनकचरा विभागाच्या सहाय्यानं निर्माल्य संकलन मोहीम राबवते.
गेल्या आठ वर्षांपासून ही संस्था हे कार्य करत आहे.. अनंत चतुर्दशीच्या विसजर्नापर्यंत साधारणपणे ८२ टन निर्माल्य यावर्षी संकलित झाले. गेल्यावर्षी हाच आकडा जवळपास १२० टन होता. यावर्षीच्या निर्माल्य संकलन मोहिमेत एकीकडे थर्माकोलचे प्रमाण नगण्य असल्याचे जाणवले तर दुसरीकडे निर्माल्य भाविकांकडून येतांना ते वर्गीकृत स्वरूपात प्राप्त होण्याचे प्रमाण यावर्षी जास्त होते.
निर्माल्यातील देवाचे फोटो, कंठ्या, प्लास्टिकची सजावट, देव्हारे आदी घटक यावर्षी निर्माल्यात जास्त आढळून आले नाहीत. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये निर्माल्य विसर्जन घाटावर येत असतांना त्यांतील ९९ टक्के पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. ८२ टन निर्माल्य संकलित होत असतांना जवळपास १४ टन प्लास्टिकसह अविघटनशील पदार्थ यावर्षी संकलित झाले आहे.
एकीकडे थर्माकोलच्या वापरात जवळपास ९० टक्के घट नोंदवत असतांना निर्माल्याचे प्रमाण देखील जवळपास ४० टक्के कमी झाल्याचे यावर्षी निदर्शनास आले आहे. पर्यावरण जनजागृती, दोन दिवस कोसळलेला मुसळधार पाऊस आणि काही प्रमाणात फुलांचे कडाडलेले भाव यातून निर्माल्याचा वापर कमी झाला असल्याचेही दिसून आले आहे.