तुषार तपासे, सातारा : लॉकडाऊनच्या काळात मुंबई-पुण्यासह अन्य ठिकाणाहून गावाकडे परतलेले लोक सध्या १५ दिवसांचा विलगीकरणाचा अनुभव घेत आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनाचे नियम पाळून बाहेरून आलेले लोक गावकऱ्यांना सहकार्य करत आहेत. तर काही ठिकाणी काही लोकांनी गावकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. पण साताऱ्यातल्या एका गावात विलगीकरणात असलेल्या लोकांनी एक वेगळाच उपक्रम हाती घेऊन आदर्श निर्माण केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मुंबई, पुणे, नगरहून आलेल्या ग्रामस्थांनी क्वारंटाईन कालावधीत तब्बल तीन हजारांहून अधिक वृक्षनिर्मितीचा ध्यास घेऊन त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.


१५ दिवसांच्या विलगीकरणाच्या काळात आपल्या गावासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने बाहेरून आलेल्या या गावकऱ्यांना एक कल्पना सूचली आणि त्यांनी तीन हजाराहून अधिक सीड बॉल तयार करण्याचा निर्णय घेतला.


विलगीकरणातील या लोकांना गावकऱ्यांनीही सहकार्य केलं. ग्रामस्थांनी त्यांना चिंच, करंज, लिंब, सीताफळ, रामफळाच्या बिया पुरवल्या. त्यातून अलगीकरणातील ५० जणांनी सुमारे तीन हजार सीड बॉल्स तयार केले.


अलगीकरणाचा कालावधी अजूनही सुरु असल्याने सीड बॉल बनवण्याची ही प्रक्रिया सुरुच आहे. आता पावसाळ्यात हे सर्व सीड बॉल डोंगर परिसरात टाकले जातील आणि त्यातून या भागात हजारो बिया रुजून येतील. हीच रोपटी पुढे मोठे वृक्ष होतील आणि फळांनी लगडतील.



कोरोना विलगीकरणाच्या या काळात नागझरी गावातल्या या उपक्रमाचं म्हणूनच सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील माजी सरपंच श्रीकांत दीक्षित आणि ग्रामस्थ जितेंद्र भोसले यांनी याबाबतची माहिती दिली.