राडा आणि तणाव, भाजप कार्यकर्त्यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांची बंदी
BJP leaders banned from entering Achalpur: अचलपूर येथे दोन गटांतील राडा प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकर्त्यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांची बंदी घातली आहे.
अमरावती : BJP leaders banned from entering Achalpur: अचलपूर येथे दोन गटांतील राडा प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकर्त्यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांची बंदी घातली आहे. येथे तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी 144 कलम लागू केले आहे. त्यामुळे जमावबंदी आहे.
भाजपच्या या नेत्यांना शहर बंदी
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. चांदुर बाजार नाका परिसरातभाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आले आहेत. त्यांना पोलिसांनी तेथेच रोखले आहे. त्यांना पुढे अचलपूरमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अमरावतीमधील अचलपूरमध्ये काल रात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरुन राडा झाला होता. झेंडा लावण्या वरुन दोन गटात वाद निर्माण झाला आणि दगडफेक झाली. अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर झेंडा फडकविल्यामुळे दोन गटात तणाव वाढला. यावेळी तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहोचले. यावेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यात एक पोलीस जखमी झाला.
पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर
दुल्हा गेटवर झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद झाला होता आणि त्या वादाचे रुपांतर दगडफेकित झाल्याने काल रात्री तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली आहे. रविवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे आहे.
आतापर्यंत 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आज सकाळपासून दोन्ही शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून सध्या दोन्ही शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरावर करडी नजर आणि शहरात काही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत आहेत.