राहुल गांधींच्या सभेकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांची पाठ, भूमिकेकडे लक्ष
संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी तातडीने स्वीकारला. एवढंच नाही तर नगरची जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त केली. विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे-पाटील पक्षाला कधी रामराम करणात याची चर्चा रंगायला लागली आहे.
राहुल गांधींची प्रचारसभा
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा आज महाराष्ट्रात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये राहुल गांधींची प्रचारसभा होतेय. शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी राहुल गांधी येतायत.शिर्डीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्यात थेट लढत आहे. राहुल गांधींच्या महाराष्ट्रात आतापर्यंत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नांदेडमध्ये सभा झाल्या. तर पुण्यात त्यांनी विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला.
मात्र मुंबईतल्या प्रचाराकडे काँग्रेसचं दुर्लक्ष झाल्याची चर्चा रंगतेय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत आज भव्य सभा आहे. संध्याकाळी पंतप्रधान मोदींची वांद्रे कुर्ला संकुलात प्रचारसभा आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र मंचावर असणार. मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांसाठी ही प्रचारसभा होतेय. मोदींची मुंबईत पहिली सभा घेऊन मुंबईतल्या प्रचारात आता भाजपने आघाडी घेतली आहे.