मोदींनी अडवाणींना जोडे मारून स्टेजखाली उतरवले - राहुल गांधी
मोदी यांनी जोडे मारून लालकृष्ण अडवाणी यांना स्टेजवरून खाली उतरवले, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
चंद्रपूर : लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू. पण या गुरुंचे हाल काय झालेत. मोदी यांनी जोडे मारून लालकृष्ण अडवाणी यांना स्टेजवरून खाली उतरवले, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी चंद्रपूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला. हिंदू धर्मात गुरूला सर्वाधिक महत्त्व असते. अडवाणी हे नरेंद्र मोदींचे गुरू आहेत. मात्र मोदी कधीही अडवाणींसमोर हात जोडत नाहीत. एवढंच नव्हे तर मोदींनी अडवाणींना जोडे मारून स्टेजखाली उतरवले, अशा तिखट शब्दात राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.
भाजपमध्ये ज्येष्ठांचा मान ठेवण्याची प्रथा नाही. स्वतःच्या गुरूचा आदर न करणारा माणूस हिंदू धर्माच्या गोष्टी करत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हिंदू धर्मात गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र, चक्क गुरुला हाकलण्यात येते. मोदींनी त्यांचा कायम अपमान केला आणि त्यांचा अनादर केला, असा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी राफेल करार, गरिबी, बेरोजगारी या मुद्द्यांवरूनही मोदी सरकारवर टीका केली. मोदी हे देशाचे नाही तर श्रीमंत उद्योजकांचे चौकीदार आहेत, असेही राहुल यांनी म्हटले आहे. १५ निवडक उद्योजकांचे कर्ज माफ करण्यास मोदी सरकारकडे पैसा आहे. मात्र. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.