भिवंडी : भिवंडी न्यायालयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेत. यावेळी, तुम्ही आरएसएसची बदनामी केली आहे, हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल कोर्टानं राहुल गांधींना विचारला.. त्याला उत्तर देताना 'आपण दोषी नसल्याचं' राहुल गांधी यांनी म्हटलंय. आज देशासमोर शेतकरी, बेरोजगारी, महागाई यासारखे गंभीर प्रश्न असताना नरेंद्र मोदी यांचं लक्ष या खटल्यावर आहे. पण मी या खटल्याला घाबरत नाही, मी माझी लढाई पुढेही लढत राहीन, असंही राहुल गांधींनी यावेळी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष - खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सुरु असलेल्या दाव्याची सुनावणी भिवंडी न्यायालयात होतेय. राहुल गांधी यांच्यावर कलम ५०० (कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची बदनामी करणे) अनुसार खटला चालवण्याची फिर्यादीनं कोर्टाकडे मागणी केलीय.  


सुनावणी दरम्यान हा दावा 'समरी ट्रायल'प्रमाणे न चालवता तो 'समन्स ट्रायल'प्रमाणे म्हणजे सविस्तरपणे चालवावा, अशी मागणी राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी कोर्टासमोर मांडली. त्यासोबतच दोषारोप न्यायालयासमोर मांडले जाणार असून मुख्य न्यायाधीश शेख यांच्याकडे सुनावणी होणार आहे. यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.


राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर 


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.  मुंबईत काँग्रेसच्या बूथ कार्यकर्ता संमेलनात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी ३ वाजता ते गोरेगाव येथे मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित काँग्रेस बूथ कार्यकर्ता संमेलनात कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. मुंबई काँग्रेसनं भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांची, तसंच मुंबई महापालिकेतल्य़ा भ्रष्टाचाराची माहिती देणाऱ्या पुस्तिका काढल्यायत. या सर्व पुस्तिकांचं प्रकाशन राहुल गांधींच्या हस्ते होणारय. सततच्या पराभवानं मरगळ आलेल्या बूथ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.


 


महात्मा गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असं खळबळजनक वक्तव्य  राहुल गांधी यांनी ६ मार्च २०१४ रोजी पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत केले होते. या वक्तव्यानं मानहाणी झालेल्या आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेत न्यायालयाकडून आरोप निश्चितीसाठी राहुल गांधी यापूर्वी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते.