Rahul Gandhi On Adivasi Areas : आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत, या देशातील जल, जंगल व जमीनीवर पहिला हक्क आदिवासींचा आहे. परंतु भारतीय जनता पक्ष (BJP) आदिवासींना वनवासी म्हणून हक्कापासून वंचित ठेवत आहे. भाजपा सरकार दलित, आदिवासींची जमीन (Adivasi Areas) ताब्यात घेऊन अदानीला देत आहे. आदिवासांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत परंतु काँग्रेस पक्ष आदिवासींच्या हक्काचे रक्षण करणारा आहे. देशात आदिवासींची 8 टक्के लोकसंख्या आहे, पण त्याप्रमाणात सत्तेत भागिदारी नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हे चित्र बदलणार व ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढाच हक्क दिला जाईल. आदिवासींचे, जल, जंगल, जमीन हक्क अबाधित ठेवणार, असे आश्वासन खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi In Nandurbar) यांनी नंदुरबार येथे बोलताना दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदूरबारमधून झाली. यावेळी राहुल गांधी यांनी होळीच्या सणाचा मान देण्यात आला होता, सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी होळीच्या शुभेच्छा देत आदिवासी व वनवासी यातील फरक समजावून सांगितला, ते म्हणाले की, आधार कार्ड योजनेची सुरुवात युपीए सरकारने नंदूरबारमधून केली होती, यातून आदिवासींची ओळख स्पष्ट करणारा संदेश दिला होता. देशात आज २२ लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती ७० कोटी लोकसंख्येकडे आहे, ही विषमता आहे.आदिवांसींची ८ टक्के लोकसंख्या आहे पण देशातील कोणत्याच क्षेत्रात आदिवासींची ८ टक्के भागिदारी नाही. युपीए सरकारने आणलेला जमीन अधिग्रहण कायदा भाजपा सरकारने कमजोर केला आहे, सत्तेत आल्यास पुन्हा हा कायदा मजबूत केला जाईल. जातनिहाय जनगणना केली जाईल, शेतमालाला एमएसपीचा कायदा लागू करणार,ज्या भागात आदिवासींची ५० टक्के लोकसंख्या आहे तेथील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आदिवासींना दिला जाईल, ६ व्या शेड्युलमध्ये त्याचा समावेश केले जाईल. मनरेगावर २४ वर्षात जेवढा खर्च केला जातो तेवढ्या रकमेचे म्हणजे तब्बल १६ लाख कोटींचे २२ उद्योगपतींचे कर्ज माफ केले पण आदिवासी, गरिबांचा एक रुपयाही माफ केला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.


यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, १२ मार्च रोजी महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश सत्तेविरोधात दांडी यात्रा काढली होती तसेच महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांची जयंतीही आजच आहे आणि आदिवासींच्या होळीचा पहिला दिवस आहे, अशा या मंगलमय वातावरणात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पावन भूमीत आगमन झाले आहे. भाजपा सरकार आदिवासींवर अत्याचार करत आहे, महिलांवर अत्याचार करत आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार केला पण भाजपा सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. जे सरकार महिलांवर अत्याचार करते त्यांची सत्ता रहात नाही हा इतिहास आहे. भाजपा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांनाच सत्तेत सहभागी करुन घेते, जलसंपदा विभागात घोटाळा झाला असे आरोप केले व त्यानांच सत्तेत आणून बसवले. आज महाराष्ट्रात खोके व बोके यांचे भ्रष्ट सरकार आहे. नंदूरबारमधून जेव्हा जेव्हा काँग्रेसचा खासदार निवडून येतो तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येते. यावेळी नंदूरबारचा खासदार काँग्रेसचाच होईल व केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.


यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, नंदूरबार हा काँग्रेस विचाराचा जिल्हा आहे, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ नंदुबारमधूनच फोडत. नंदूरबारला मोठा इतिहासही आहे, १९४२ च्या आंदोलनात पहिले बलिदान नंदूरबार जिल्ह्याने दिले आहे. राहुल गांधी यांनी आधी ४००० किमी पदयात्रा काढली व आता भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून न्याय देण्याचा संकल्प घेऊन ते मणिपूरपासून मुंबईपर्यंत निघाले आहेत. आपल्याला आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात व केंद्रात काँग्रेसची सत्ता आणायची आहे, असे आवाहन थोरात यांनी केले.