`आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ` म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; मोदी OBC नसल्याचा दावा
Rahul Gandhi On OBC: भारतात 88 टक्के जनता ओबीसी आणि मागासवर्गीय आहे. देशात या 88 टक्के लोकसंख्येला देशातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भागीदारी का दिली जात नाही? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.
Rahul Gandhi On OBC: काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी आज भारत जोडो न्याय यात्रेमध्ये वाडा येथे जाहीर भाषण केलं. या भाषणामध्ये राहुल गांधींनी केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांवर टीका केली. भारतामधील 88 टक्के लोकसंख्या ही ओबीसी आणि मागास वर्गातील असूनही त्यांना त्या तुलनेमध्ये योग्य हिस्सेदारी दिली जात नाही असा आरोप राहुल गांधींनी केला.
अदानींची जमीन का अधिग्रहित होत नाही?
"पिक विमा योजनेचा किती पैसा भारत सरकार देते? किती पैसे राज्य सरकार देते? 35 हजार कोटी रुपये कुठून येतात? 16 कंपन्यांची यादी देतो मी तुम्हाला त्यांना हे पैसे देतात. या कंपन्यांमध्ये तुमच्यापैकी (ओबीसींपैकी) कोणीच नाही. तुम्हाला कंपन्यांकडून नुकसानभरपाई दिली जात नाही. खासगी हॉस्पीटलच्या मालकांमध्ये तुमच्यापैकी कितीजण आहेत? तुम्ही कधी पेपरमध्ये वाचलंय का अदानींच्या जमीनचं अधिग्रहण झालं. ओबीसी, दलित आणि आदिवासींची जमिनीचं अधिग्रहण केलं जातं. त्यांनी असं काय काम केलं आहे की त्यांची जमीन अधिग्रहित केली जात नाही," असं राहुल गांधी म्हणाले.
मोदी ओबीसी नाहीत
"मोदीजी म्हणतात ते ओबीसी आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ओबीसी नाहीत. ते जनरलअंतर्गत येणाऱ्या जातीमधील व्यक्ती होते. गुजरातमध्ये भाजपाने कायदा बदलून त्यांची जात ओबीसीअंतर्गत आणली. प्रश्न हा नाही की मोदी ओबीसी आहेत की नाही. प्रश्न हा आहे की मोदींनी मागील 10 वर्षांमध्ये 88 टक्के जनतेसाठी काय केलं आहे? तुम्ही मीडियामध्ये नाही, खासगी रुग्णालयांमध्ये नाही, खासगी कॉलेज, शाळांमध्ये नाहीत. या सर्वांच्या मालकांपैकी मागासलेल्या समाजातील लोक कोण आहेत सांगा? कोणीच नाही. तुमच्याकडून 24 तास लुटलं जात आहे. तुम्ही नुसत्या माना डोलवत आहात. नुसत्या माना डोवल्याने काय होणार आहे?" असा सवाल राहुल गांधींनी विचारला.
आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ
भारताच्या 88 टक्के लोकसंख्येला देशातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भागीदारी का दिली जात नाही? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. "हायकोर्टाचं उदाहरण घ्या. 650 हायकोर्ट न्यायाधीश आहेत देशात. सर्व प्रकरणांमध्ये न्याय हे लोक देतात. 10 ते 20 वर्ष लागतात न्याय मिळवण्यासाठी लोकांचा मृत्यू होतो तरी प्रकरणं कोर्टात सुरुच असतात. या 650 पैकी 88 टक्क्यांमधील किती आहेत? 100 जण आहेत. ते पण छोटी छोटी प्रकरणं पाहतात. 3 टक्के लोकांच्या हाती न्यायव्यवस्था, पैसा, कॉर्परेट, प्रसारमाध्यमं, ईव्हीएम आहेत. ते तुम्हाला सांगतात आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ. भुके मर जाओ," असं राहुल गांधी म्हणाले. "तुम्ही काय करता? हो म्हणता. हात जोडून उभे राहता. तुम्ही सर्व घेऊन जा म्हणता आणि हात जोडून प्रभूचे गुण गात उभे राहता. नुकसान तुमचं होतं आहे. तुम्हाला हसू येत आहे का? राग यायला हवा," असंही राहुल गांधी म्हणाले.
...म्हणून भाजपावाले मला घाबरतात
तसेच आपण देश चालवणारी संपूर्ण यंत्रणा आतून अगदी जवळून पाहिली आहे असं राहुल गांधी म्हणाले. "सरकारमध्ये तुमचा वाटा आहे असं तुमचं म्हणणं असेल. तुमचा ओबीसी प्रधानमंत्री आहे असं वाटत असेल तर तुम्हाला सांगतो की देशातील सरकार आमदार, खासदार चालवत नाहीत. भारताचं सरकार 90 आयएएस अधिकारी चालवतात. मी हे सारं आतून पाहिलं आहे. मी यंत्रणांच्या आत बसून सारं काही पाहिलं आहे म्हणून भाजपावाले मला घाबरतात," असं राहुल गांधी म्हणाले.