अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यातील दिवेआगर ( Diveagar) येथील सुवर्ण गणेश (Golden Ganesha) पुन्हा प्रस्थापित पुनर्स्थापनेचा  मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीअंती बुधवारी न्यायालयाने याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुखवट्याचे सोने राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Raigad : Clear the way for the restoration of the Golden Ganesha at Diveagar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दोघा सुरक्षा रक्षकांचा खून करुन दिवेआगरच्या मंदिरातील हा सुवर्ण गणेशाचा मुखवटा आणि दागिने मिळून 1 किलो 600 ग्राम सोने पळवून नेले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन दरोडेखोरांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून वितळलेल्या मुखवट्याचे 1 किलो 361 ग्राम सोने लगडीच्या स्वरुपात हस्तगत केले होते. 


जिल्हा न्यायालयाने आरोपीना शिक्षा झाली. परंतु सुवर्ण गणेश मुखवट्याच्या स्वरुपात न राहिल्याने सोने परत करण्यास खालच्या न्यायालयाने नकार दिला होता. त्यातच आरोपीनी उच्च न्यायालयात अपील केल्यामुळे हे सोने परत मिळवण्यात अडचणी येत होत्या. हे सोने परत मिळावे यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता . त्यावरील सुनावणीअंती हे सोने पुन्हा राज्य सरकारला द्यावे , असे निर्देश बुधवारी न्यायालयाने दिले आहेत. 


त्यामुळे सोन्याचा मुखवटा मंदिरात स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  17 नोव्हेंबर 1997 रोजी दिवेआगर येथील द्रोपदीबाई पाटील यांच्या बागेत खोदकाम करताना हा मुखवटा व दागिने एका तांब्याच्या पेटीत सापडला होता . तो स्थानिक ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिरात ठेवण्यात आला होता.