कोकणात भातलावणीच्या कामाची लगबग
रायगडमधील शेतकरी सुखावला
रायगड : यंदा मान्सून अगदी योग्य वेळेत कोकणात दाखल झाला त्यामुळे पेरणीची कामे आटोपली होती. काही दिवसांची विश्रांती घेत वरुणराजा परत बरसला. मागील 4 दिवसांपासून झालेल्या पावसाने शेतात पाणी झाले आहे. भाताची रोपे फूटभर वर आली आहेत .शेतीला आवश्यक असणाऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा लावणी चक्क जून महिन्यांत सुरू झाल्याचे रायगड मध्ये पहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्याच्या काही भागात भातलावणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. सरासरी जून महीन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसात पेरणी होते तर समाधानकारक पाऊस झाला की जुलै महिन्यात लावणीच्या कामाला सुरुवात होत असते.
यंदा मात्र निसर्गाने या परंपरेला फाटा देत शेतकरी जून महिन्यातच लावणी करू शकेल अशी व्यवस्था केल्याने रायगडमधील शेतकरी सुखावला आहे. पावसाने अशीच कृपा ठेवली तर यंदाचे पिक विक्रमी होईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.